राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ, महिला आयोग अकार्यक्षम, नवीन अध्यक्ष नेमण्यात यावा; रोहिणी खडसेंची मागणी

“महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये महिला आयोग हे अकार्यक्षम ठरलेलं आहे. यासाठीच आमची विनंती आहे की, महिला आयोगात नवीन अध्यक्ष नेमण्यात यावा”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत की, “सुप्रिया सुळे या येत्या 22 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्या महाराष्ट्रात एक लढा उभा करणार आहेत. महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करणार आहेत, जेणेकरून कोणतीही महिला हुंडाबळी ठरू नये. त्याच्यावरती जे अत्याचार होत आहे ते होऊ नयेत, म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी सुप्रिया सुळे यांच्यासोबत महाराष्ट्रभर फिरणार आहोत.”

रोहिणी खडसे म्हणाल्या, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. रुपाली चाकणकर आणि त्यांच्या टीमकडून महिलांना धमकवण्याचे जे प्रकार समोर येत आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तसेच चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करणार आहोत.”