भाजपला एवढा द्वेष का? मुंबई संपवायची आहे का? नुकसानग्रस्तांना भरपाई द्या! – आदित्य ठाकरे

मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी मुंबईत पाणी साचले होते. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक दुकानात व घरांमध्ये पाणी शिरले होते. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेकांचे नुकसान झाले आहे. याबाबत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजपला फटकारले आहे. तसेच ज्यांचे या पावसात नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

”आज महाराष्ट्रात प्रशासनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.मे महिन्यातच, मुंबई पावसामुळे कोलमडली आहे. गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका पाण्याखाली गेले होते. आज दक्षिण आणि मध्य मुंबईला भाजप आणि भ्रष्ट मिंधे नियंत्रित महापालिकेच्या कारभाराचा फटका बसला आहे. हिंदमाता आणि गांधी मार्केट हे नेहमीच पावसाळ्यात जलमय होणारे भाग आमच्या सरकारने 2022 मध्ये पूरमुक्त केले होते.आज पुन्हा ते भाग जलमय झाले, यायाचे एकमेव कारण म्हणजे ढिम्म प्रशासन”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केली.

”वरळीतील मेट्रो स्टेशन, ज्याचे दोन आठवड्यांपूर्वीच उद्घाटन झाले, तिथली भिंत कोसळली, पाणी साचले, गटाराचे पाणी आत शिरले. केम्प्स कॉर्नरजवळील नव्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केईएम हॉस्पिटल, नेपियन्सी रोड, महापालिकेचे वॉर्ड ऑफिसेस आणि मंत्रालयाजवळसुद्धा पाणी साचले आहे. भाजपला मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपला मुंबई का संपवायची आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

”मी उघडकीस आणलेल्या रस्ते घोटाळ्याचे गंभीर परिणाम आज मुंबई अनुभवतेय. नालेसफाई अर्धवट झालीय आणि त्यातून काढलेली घाण, गाळ बाजूलाच ठेवलेला आहे. तोही अजून उचललेला नाही! राज्यसरकारने या निष्काळजीपणाची चौकशी करावी. तसेच पाण्यामुळे ज्यांच्या दुकानांचे, घरांचे नुकसान झाले, त्या मुंबईकरांना सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशीमागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.