
महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात अनेक भागात दाणादाण उडाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिकसह अनेक भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर आला असून काही ठिकाणच्या नद्या पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहत आहेत.
सांगली जिह्यातील येरळा नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच येथील वाझर बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. कडेगाव खानापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचे पात्र पाण्याने पूर्ण भरले आहे. भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आला असून भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीतसुद्धा मोठी वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास 15 फुटांपर्यंत पोहोचली आहे. जिह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत दोन मीटरने वाढ झाली आहे. पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचे 40 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गावाशेजारील ओढे भरून वाहत आहेत.
कोल्हापुरात कोसळधारा
कोल्हापुरात सोमवारी कोसळधारा पाहायला मिळाल्या. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी मैदानात पाणीच पाणी झाले आहे. कोल्हापूर जिह्यातील पाचही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधारा, रूई, इचलकरंजी, येवलुज आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. लोकांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खामगावातील सूर्या नदीला पूर
बुलडाणा जिह्यातील सूर्या नदीला पूर आला आहे. यामुळे खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी सकाळपासून मुसळधार पाऊस येत असल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
- माण तालुक्यातील म्हसवड येथील माण नदी पात्रालगत स्थायिक झालेल्या कुटुंबांना पालिकेने सुरक्षित स्थळी हलवले.
अकलूजमध्ये नीरा नदीचे उग्र रूप
अकलूजमधील नीरा नदीने उग्र रूप धारण केले आहे. नीरा नदीच्या काठावर असणाऱ्या या अकलाई मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी शिरले आहे. दर्शनाला आलेल्या अकलूजकरांनी नीरेचे हे रौद्ररूप पाहण्यासाठी गर्दी होती.
- सोलापूरच्या कुरुबावी गावात पावसामुळे पाणी शिरले आहे. त्यामुळे एनडीआरएफला येथे मदत व बचाव कार्य राबवावे लागले.