
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडची चाकरी करणारे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. वादग्रस्त पोलीस अधीकारी रणजीत कासले यांनीही कराडचा कारागृहात व्हीआयपी पाहुणचार करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्चकंठश्च वाल्मीक कराडसह आठ जणांना ‘मकोका’ लावण्यात आला आहे. या सर्वांचा मुक्काम सध्या बीड कारागृहात आहे. बीड कारागृहात वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर देशमुख कुटुंबानेही कराडला देण्यात येणार्या सुविधांवर आक्षेप घेतला होता. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनीही कराडला कारागृहात मिळणार्या वागणुकीचा भंडाफोड केला होता.
बीड कारागृहाचे अधीक्षक बक्सार मुलानी यांची आज तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर रत्नागिरीहून रामराजे चांदणे येणार आहेत. वाल्मीक कराडचा पाहुणचार करणे मुलानी यांना भोवल्याची चर्चा आहे. मुलानी हे गेल्या तीन वर्षांपासून बीड येथे कार्यरत होते. कार्यकाळ संपल्यानेच त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी वाल्मीक कराडशी असलेली जवळीकच त्यांना भोवल्याचे स्पष्ट झाले आहे.