
राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली.
मुसळधार पावसाने भाजप युती सरकारचे सर्व दावे पह्ल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही मुंबईत जागोजागी पाणी साचले. 25 वर्षे भाजप शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती. एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. मग याकाळात भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले, अशी विचारणा करत सरकारने आरोप -प्रत्यारोपाचा खेळ सोडून जनतेला मदत करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
मंत्रिमंडळ शहा यांच्या खुशामतीमध्ये मग्न
महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शहा यांची खुशामत करण्यात मग्न आहे. शहा यांनी निवडणूक प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या. त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसतो. अमित शहा महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
विश्वास उटगी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उटगी यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.




























































