
अमेरिकेतील कोलोराडोमधील बोल्डर येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 6 जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे एफबीआयने म्हटले आहे. हल्ला करणाऱ्या संशयिताने फ्री पॅलेस्टाईनचा नारा दिला आणि जमावावर अग्नीगोळा (फ्लेम थ्रोवर) फेकला. या हल्ल्यात ज्यू निदर्शकांना लक्ष्य करण्यात आले होते.हमासने ओलीस ठेवलेल्या ज्यू निदर्शकांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी ज्यू लोकांचा समुदाय तेथे जमला होता. हल्लेखोर संशयिताची ओळख मोहम्मद साबरी सोलिमान (45) अशी झाली आहे. घटनेनंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान ज्यू समुदायाविरुद्ध वाढत्या यहूदीविरोधी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यहूदी निदर्शकांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल ज्यू संग्रहालयाबाहेर इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली. हल्ल्यात काही लोक गंभीर जखमी झाले, तर काहींना किरकोळ दुखापत झाली.
एफबीआय संचालक काश पटेल यांनी एक्स वर पोस्ट केले, ‘आम्हाला कोलोरॅडोच्या बोल्डरमध्ये लक्ष्यित दहशतवादी हल्ल्याची माहिती आहे आणि आम्ही पूर्णपणे चौकशी करत आहोत. आमचे एजंट आणि स्थानिक अधिकारी आधीच घटनास्थळी आहेत आणि अधिक माहिती उपलब्ध होताच आम्ही त्याबाबतची माहिती देऊ. एफबीआयचे उपसंचालक डॅन बोंगिनो म्हणाले की, सुरुवातीच्या माहिती, पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून हा दहशतवादी हल्ला असल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीने निदर्शकांवर असे काहीतरी फेकले जे घरगुती मोलोटोव्ह कॉकटेलसारखे दिसत होते. लोक शांततेत हमासने ताब्यात घेतलेल्या इस्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी करत होते.