
अमरनाथ यात्रेसाठी 50 हजार जवान तैनात
येत्या 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेत कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी 50 हजार सीआरपीएफचे जवान तैनात केले जाणार आहेत. यामध्ये महिला बीएसएफ जवानांचाही समावेश आहे. तसेच या यात्रेत सुरक्षेसाठी जॅमर आणि ड्रोनचासुद्धा वापर केला जाणार आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला होता. ही यात्रा 3 जुलैला सुरू होणार असून 9 ऑगस्टला संपणार आहे.
कराचीतील कैदी फरारप्रकरणी 23 अधिकारी निलंबित
कराचीतील मलीर तुरुंगातून 216 कैदी फरार झाल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस महासंचालकसह 23 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे तुरुंगमंत्री अली हसन झरदारी स्वतः या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पळून गेलेल्या 216 पैद्यांपैकी 126 कैद्यांना पकडण्यात यश आले असून 90 कैदी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
अॅपलचे चौथे स्टोअर मुंबईच्या बोरिवलीत उघडणार
अॅपल कंपनीने आपले चौथे स्टोअर मुंबईतील बोरिवलीत स्टोअर उघडण्याची तयारी सुरू केली असून यासाठी कंपनीने 12,616 चौरस फुटाची जागा 10 वर्षांसाठी भाडय़ाने घेतली आहे. या स्टोअरसाठी कंपनी 17.35 लाख रुपये महिना भाडे देणार आहे. कंपनीने 1.04 कोटी रुपयांची सिक्योरिटी रक्कमसुद्धा जमा केली आहे. दरम्यान, अॅपलची नवी सीरिज आयपह्न 17 सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे.
‘स्पिरिट’नंतर ‘कल्की-2’ चित्रपटातूनही दीपिका बाहेर
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या हातातून बिग बजेट चित्रपट ‘स्पिरिट’ गेला असतानाच आता ‘कल्की-2’ हा चित्रपटही तिच्या हातातून गेला आहे. दीपिका पादुकोणच्या वाढत्या मागण्यांनी ‘स्पिरिट’ चित्रपटाचा निर्माता संदीप वांगा हैराण झाला होता. अखेर चित्रपट निर्मात्याने दीपिकाला चित्रपटातून काढल्याची घोषणा केली. यानंतर आता ती ‘कल्की-2’ या चित्रपटातूनही बाहेर गेली आहे.
सौदीत हजसाठी पोहोचले 14 लाख मुस्लिम
सौदी अरबमधील मक्का येथे 4 जूनपासून हज यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी जगभरातील 14 लाखांहून अधिक मुस्लिम हजसाठी सौदीत पोहोचले आहेत. या वर्षी सौदीमध्ये प्रचंड उष्णता आहे. 40 डिग्रीहून अधिक तापमान असल्याने हजसाठी गेलेल्यांसाठी आव्हान आहे. गेल्या वर्षी हज यात्रेवेळी झालेल्या मृत्यूमुळे सौदीने उन्हापासून बचावासाठी ठिकठिकाणी मंडप टाकले आहेत.