
शिवसेनेत सध्या जोरदार इनकमिंग सुरू असून जानेवारी महिन्यात शिवसेना सोडून मिंधे गटात सामील झालेल्या माजी महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे आज पुन्हा स्वगृही परतल्या. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांची घरवापसी झाली. पूर्वीपेक्षा आणखी जोमाने काम करा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुजाता शिंगाडे यांच्यासारखी जुनी कार्यकर्ती शिवसेना का सोडू शकते अशा विचाराने त्या वेळी धक्का बसला होता. पण गेले तीन-चार महिने मिंधे गटातील बेबंदशाही, अंदाधुंदी त्यांनी जवळून पाहिली. तेथील विचित्र वातावरणामुळे त्या बेचैन होत्या, अस्वस्थ होत्या. त्यांनी पुन्हा शिवसेनेत येण्याचे धाडस केले याबद्दल काwतुक करावे लागेल आणि हे धाडस शिवसैनिकामध्येच असू शकते. जे लाचारीसाठी मिंध्यांकडे गेलेत त्यांच्यात तसे धाडस असूच शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना नेते व पक्षाचे सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, माजी आमदार विलास पोतनीस आदी उपस्थित होते.
मिंधे गटात फक्त दिखावा आहे, कुणाचा कुणालाही ताळमेळ नाही, सर्व अंदाधुंदी कारभार आहे, एकनाथ शिंदे तर कुणाकडे बघतही नाहीत, पैशाच्या आमिषाने गेलेल्या लोकांना तिथे पश्चात्ताप होतोय, अशी वस्तुस्थितीही त्यांनी मांडली. उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही, नगरसेवक निघून जात आहेत तरीही उद्धव ठाकरे ठाम आहेत, ते जी जबाबदारी देतील ती पार पाडेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणाही शिंगाडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. अंधेरी पूर्व येथील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनीही आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हाती शिवबंधन बांधले.
खरी शिवसेना ‘मातोश्री’तच, मिंधे केवळ दिखावा – सुजाता शिंगाडे
गेल्या जानेवारीत मी मिंधे गटात प्रवेश केला होता. पण मिंधे गटात जाणे ही माझी मोठी चूक होती, मधल्या एजंटने मला फसवले, खरी शिवसेना ‘मातोश्री’तच आहे, आज मी माझ्या माहेरी परतले, खूप आनंद होतोय, अशा भावना या वेळी सुजाता शिंगाडे यांनी व्यक्त केल्या. मला कोणतेही आमिष नाही, म्हणून मी मिंधी नाही, असे त्या म्हणाल्या. 35 वर्षे मी शिवसेनेसाठी काम केले आहे. ‘मातोश्री’ने मला अनेक महत्त्वाची पदे दिली. शिवसेना सोडल्यानंतर मला चार महिने झोप लागली नाही. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना कधी भेटतेय असे झाले होते, असेही त्या पुढे म्हणाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती समर्थपणे सांभाळणार असल्याचा विश्वासही शिंगाडे यांनी व्यक्त केला.