
>> अस्मिता येंडे
मानवी मनाच्या तळाशी अनेक तरंग उमटत असतात. विचारांच्या खोल गर्तेत नेमके कधी काय गवसेल सांगता येणार नाही. तोच नेमका भाव अलगद वेचून घेणारा कवी असतो. शब्दांच्या सुयोग्य रचनेतून भावनिक सेतू बांधणारा कवी कधी संवेदनशील होतो, कधी विद्रोही होतो तर कधी ‘बेधडक’ होतो. आपले मत, विचार व्यक्त करताना बऱयाचदा लोकविचारापायी माणूस मौन धारण करतो. आपल्या विचारांनी जनमानसात अस्थिरता निर्माण होईल की काय, या विचारामुळे सजग विचारांची मालिका दुभंगते.
कविता ही फक्त मनोरंजन करणाऱया शब्दांच्या ओळी नाहीत तर तमाम जनतेच्या विचारतत्त्वांचा प्रातिनिधिक आवाज होऊ शकते, हे वैशिष्टय़ लक्षात घेऊन कवी दीपक सोनवणे यांनी ‘63 बेधडक’ हा नवाकोरा कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस आणला आहे. ‘कवीदीप’ म्हणून प्रसिद्ध असणारे कवी दीपक सोनवणे हे लेखक, अभिनेता, सूत्रसंचालक, समालोचक, गायक, गीतकार, संगीतकार, क्रिकेटपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपले शिक्षणक्षेत्र भलेही वेगळे असले तरी शालेय जीवनापासून असलेली वाचनाची आवड, कुटुंब व शाळेच्या माध्यमातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे कवी सोनवणे यांचे व्यक्तित्व अधिक बहरत गेले.
‘63 बेधडक’ या कवितासंग्रहाचे शीर्षक वाचून प्रथमतः मनात प्रश्नासोबतच उत्सुकता निर्माण होते. हे ‘63 बेधडक’ म्हणजे नेमके काय? तर या कवितासंग्रहात 63 कवितांचा समावेश असून, कविता यमक अलंकाराने आविष्कृत आहेत. सामाजिक अराजकता, राजकीय हेवेदावे, सामान्यांची हतबलता, जातिभेदाच्या सीमारेषा, अन्याय – अत्याचार, धर्मांधता, पर्यावरणीय ऱहास, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी, मोडकळीस आलेली लोकशाही, आरक्षण, राजकारण इ. सामाजिक कक्षेत अधिक ठळकपणे दिसून देणाऱया, पण दुर्लक्षित केल्या जाणाऱया समस्यांवर कवीने परखडपणे भाष्य केले आहे. सामाजिक परीघात वावरताना समाजाचा एक घटक म्हणून आपण या नकरात्मकतेपासून अलिप्त राहू शकत नाही. थोडय़ाफार प्रमाणात या घटकांचा परिणाम मनावर होतो, त्यामुळे मन अधिक विषण्ण होते.
या परीघाचा भाग म्हणून या समस्या, वेदना, अस्थिरता कवी सोनवणे यांनी अनुभवली. या असंवेदनशीलतेने त्यांचे मन उद्विग्न झाले. या उद्विग्नतेतून जो भावनिक विस्फोट झाला, तो कवीने कवितेच्या माध्यमातून निर्भीडपणे मांडला, तोही बेधडक! आपल्या नजरेसमोर जर अनिष्ट गोष्टी घडत असतील तर त्याला प्रतिकार हा केलाच पाहिजे, ही भूमिका कवीने साकारली आहे. जातीपातीच्या राजकारणातून पाडले जाणारे मुडदे, धर्मांधतेतून विभागली जाणारी माणसे, स्त्राr सक्षमीकरणाच्या बढाया, अन्याय झाल्यानंतर जागे होणारे घटक, देवत्वाची कातडी पांघरून गुन्हेगारी वृत्ती जोपासणारे दैत्यरूपी देह, अशी दांभिकतेवर कवीने जोरदार प्रहार केला आहे. शब्द हे शस्त्रांसारखे असतात, अधिक टोकदार, त्यांचा अपेक्षित ठिकाणी वापर केला की त्याचा परिणाम अधिक सूक्ष्म आणि सखोलरीत्या साधला जातो. कवीने हे शब्दास्त्र वापरून अन्यायाच्या ओझ्याखाली दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे आणि समाजविघातक घटकांना विरोधही केला आहे.
पलपब प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहास लेखक, कवी, चित्रकार रामदास खरे यांनी यथासांग प्रस्तावना लिहिली असून कवी, अनुवादक उदय भिडे यांनी कवितासंग्रहाची मौलिक पाठराखण केली आहे.
63 बेधडक – कवितासंग्रह
कवी ः दीपक सोनवणे
प्रकाशक ः पलपब पब्लिकेशन
मूल्य ः 199 रुपये