Maharashtra Election 2024 : लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबाबत निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिले होते. निवडणूक आयोगाच्या उत्तरानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा X वर एक पोस्ट करून महाराष्ट्राची मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही (निवडणूक आयोग) एक संवैधानिक संस्था आहात. मध्यस्थांना स्वाक्षरी नसलेल्या टाळाटाळ करणाऱ्या नोट्स देणे हा गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्याचा मार्ग नाही. टाळाटाळ केल्याने तुमची विश्वासार्हता जपली जाणार नाही. सत्य बोलल्याने तुमची विश्वासार्हता जपली जाईल.” ते म्हणाले की, “जर तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरे द्या आणि ते सिद्ध करा..”

ते म्हणाले, “लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकींसह महाराष्ट्रातील अलीकडील निवडणुकांसाठी एकत्रित, डिजिटल आणि मशीन-वाचनीय मतदार यादी जाहीर करावी. महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी 5 नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावे. गोष्टी टाळल्याने तुमची विश्वासार्हता जपली जाणार नाही. सत्य बोलल्याने तुमची विश्वासार्हता जपली जाईल.”

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांचे निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करून खंडन केलं आहे. निवडणूक कोणीही चुकीची माहिती पसरवणे हे केवळ कायद्याचे उल्लंघनच नाही तर स्वतःच्या राजकीय पक्षाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची बदनामी करणं देखील आहे, असं आयोगाने म्हटलं आहे.