वडाळा रेल्वे पोलिसांचा प्रवासी महिलेला सुखद धक्का, लोकलमध्ये राहिलेली दागिन्यांची बॅग परत मिळवून दिली

प्राजक्ता बावधने ही महिला मानसरोवर रेल्वे स्थानकात उतरली. थोडय़ा वेळाने तिच्या लक्षात आले की, आपले साडेचार लाखांचे दागिने असलेली बॅग लोकलमध्येच राहिली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पोलिसांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. तोपर्यंत बराच वेळ झाला होता. आपले दागिने गेले अशा विचारात असताना वडाळा रेल्वे पोलिसांनी ती बॅग परत मिळवून देत प्राजक्ता यांना सुखद धक्का दिला.

पुण्यात राहणाऱ्या प्राजक्ता बावधने मुंबईला आल्या होत्या. शुक्रवारी त्या पुन्हा पुण्याला जायला निघाल्या.  प्राजक्ता यांच्यासोबत त्यांचा भाऊ उदय शिंदे हादेखील होता. दोघांनी कुर्ल्याहून पनवेल लोकल पकडली. ते मानसरोवर स्थानकात उतरले. थोडय़ा वेळाने त्यांच्या लक्षात आले की सोन्याचे दागिने ठेवलेली सॅक बॅग आपल्या जवळ नाही. त्यांनी तत्काळ आरपीएफच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क काही होत नव्हता. अखेर उदय यांचा रेल्वे पोलिसांशी संपर्क झाला. तोपर्यंत ती लोकल पनवेलहून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रवाना झाली होती. आता आपले दागिने गेले असा विचार उदय आणि प्राजक्ता यांच्या डोक्यात घोळत होता.  काय करायचे हेच त्यांना कळत नव्हते. दोघेही प्रचंड टेन्शनमध्ये असताना त्यांना वडाळा रेल्वे पोलिसांचा पह्न आला आणि एका क्षणात त्यांचे टेन्शन नाहीसे झाले. कारण प्राजक्ता यांची दागिने असलेली बॅग वडाळा पोलिसांच्या ताब्यात होती.

z उदय यांचा संपर्क झाल्यानंतर वडाळा रेल्वे पोलिसांनी ती लोकल टॅक केली. महिला अंमलदार तावरे यांनी डॉकयार्ड रोड स्थानकात तैनात असलेल्या अंमलदार जाधव यांना 19.53 मिनिटांनी सीएसएमटी जाणाऱ्या लोकलच्या मधल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात सोन्याचे दागिने असलेली बॅग असल्याचे कळवले. त्यानुसार जाधव यांनी डॉकयार्ड रोड स्थानकात त्या लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यात जाऊन ती बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर प्राजक्ता यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे 4 लाख 23 हजार किमतीचे सोन्याचे दागिने व बॅग परत करण्यात आली. नशीब बलवत्तर म्हणून कुणी ती बॅग नेली नाही. त्यात पोलिसांनी मदतीचा हात दिल्याने दागिने पुन्हा मिळू शकले.