
>> प्रभाकर पवार, [email protected]
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कसाऱ्याकडे निघालेल्या दोन लोकलमधील 4 प्रवाशांचा फूटबोर्डवरून खाली पडून सोमवार दि. 9 जून 2025 रोजी मुंब्रा येथे दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये एका रेल्वे पोलिसाचाही समावेश आहे. मध्य व पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 8 ते 10 प्रवाशांचा रोज बळी जातो. त्यात एक तरी महिला असते. दरवर्षी मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या तीन ते साडेतीन हजार प्रवाशांचा बळी जातो हे आम्ही 5 वर्षांपूर्वीच याच स्तंभात लिहिले होते. आजही त्या परिस्थितीत बदल झालेला नाही.
मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या लोकल दुर्घटनेत दरवाजात उभ्या असलेल्या चार प्रवाशांचा बळी गेला. इतर नऊ प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेबाबत रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या गर्दीकडे बोट दाखवीत असले तरी ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील रेल्वे माग्र्गिकचे ‘धोकादायक वळण’ (रेल्वेच्या भाषेत ‘ब्लॅक स्पॉट’) प्रवाशांसाठी कधीतरी जीवघेणे ठरणारच होते. या दुर्घटनेने लोकल प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे प्रशासनाचा ढिम्मपणा पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. रेल्वेची ही बेपर्वाई गेली अनेक वर्षे प्रवाशांच्या जिवावर उठत आहे. 29 सप्टेंबर, 2017 रोजी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला त्यावेळच्या एल्फिन्स्टनच्या पुलावरील जिन्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचे बळी गेले. रेल्वे प्रशासन पुरस्कृत असे हे हत्याकांड कधीतरी होणारच होते. मुंबईतील रेल्वे लोकलमधून रोज लाखो प्रवासी किड्यामुंग्यांसारखे चढत-उतरत असतात. जीव मुठीत घेऊन लोंबकळत असतात. त्यातून कधी कुणाचा हात सटकून धावत्या गाडीतून तो खाली पडतो. तर कधी कुणी फलाटावर पडून रेल्वे रुळाखाली येतो. कधी पर्याय नाही म्हणून रेल्वे ओलांडताना उभा-आडवा कापला जातो. रेल्वे रूळ ओलांडताना चिरडून मरणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे.
गर्दीचा मारा असह्य झाल्याने, श्वास कोंडल्यानेही रेल्वे डब्यात अॅटॅक येऊन प्रवासी कोसळत आहेत आणि काही वेळात आपला प्राण गमावत आहेत. असे रोज सरासरी 8 ते 10 रेल्वे प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. वर्षाला सरासरी तीन ते साडेतीन हजार प्रवासी मुंबई रेल्वे लोकलमधून प्रवास करताना मृत्युमुखी पडतात. हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. परंतु रेल्वे मंत्रालयाने त्याची कधी दखलच घेतली नाही. 29 सप्टेंबर २०१७ रोजी परळ-एल्फिन्स्टनच्या पुलावरील जिन्यावर घडलेल्या अमानुष मृत्युकांडानंतर रेल्वे मंत्रालय जागे झाले होते, परंतु त्याला फार उशीर झाला होता. आज तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे.
मुंबईवर रोज आदळणारे लोंढे, त्यामुळे सामान्य प्रवाशांचा, मूळ मुंबईकरांचा आज श्वास कोंडला आहे. मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणे त्याला असुरक्षित वाटत आहे. कधी तुमचा खिसा कापला जाईल. तुमच्या हातातील मोबाईल, बॅग हिसकावली जाईल हे सांगता येणार नाही. प्रवास करताना रेल्वे डब्याजवळील गेटवर उभे राहून मोबाईलवर बोलत असताना समजा तुमची गाडी एखाद्या इलेक्ट्रिक पोलजवळ थांबली, स्लो झाली तर इलेक्ट्रिक पोलजवळ दबा धरून बसलेला लुटारू कधी फटका मारून तुमचा किमती मोबाईल उडवेल याचाही नेम नाही. मोबाईल गेला तर हरकत नाही, परंतु अशा अनपेक्षित हल्ल्यामुळे रेल्वेखाली पडून बऱ्याच जणांचा मृत्यूही होतो खाली पडल्यावर महिला असेल तर मोबाईलसह तिच्या गळ्यातील मंगळसूत्रही पळविले जाते. रेल्वेमध्ये असे गुन्हे आता मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आज रेल्वे स्थानकावर पाय ठेवताना प्रवासी भयभीत होतात. कधी कुठला गर्दुल्ला, लुटारू अंगावर येईल याची खात्रीच नाही. रेल्वे स्थानके ही आज गर्दुल्ले व गुन्हेगारांची आश्रयस्थाने झाली आहेत. जीवघेण्या गर्दीत त्यांचे फावते आहे. अगदी महिलांचा मोठ्या प्रमाणात विनयभंगही केला जात आहे, परंतु बहुसंख्य महिला पोलीस, कोर्ट-कचेऱ्या नको म्हणून तक्रार करीत नाहीत. याचाच फायदा आज अपप्रवृत्ती घेत आहेत.
कष्टकरी रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा म्हणून केंद्र शासनाने कधीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे रेल्वे रुळानजीक झोपड्या वाढल्या. त्या झोपड्यांतून दगडफेक करून प्रवाशांचे डोळे व डोकी फोडण्याचे प्रकार सुरूच असतात. हे सारे अपप्रवृत्तींकडून केले जात असले तरी रेल्वेलगत झोपड्या होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासनाने कोणतीही उपाययोजना कधी केली नाही. आज वांद्रे पश्चिमेलगतच्या झोपड्यांनी उग्र रूप धारण केले आहे. अगदी रेल्वे स्थानकामध्ये फेरीवाले घुसले आहेत. वांद्रे रेल्वे रुळावरच दोन-दोन, तीन-तीन माळ्यांची घरे बांधली आहेत.
वांद्रे येथून प्रवास करताना प्रवासी रात्रीच्या वेळेस जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतो. रेल्वेच्या ‘आरपीएफ’मध्ये जितका भ्रष्टाचार आहे तितका कुठेही नाही. तेथे महत्त्वाच्या पोस्टिंग मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजले जातात. मागे एका माजी रेल्वेमंत्र्याचा भाचा विजय सिंगला यास ९० लाखांची लाच घेताना सीबीआयने अटक केली होती. रेल्वेतील Lucrative पोस्टिंगसाठी विजय सिंगला हा लाच घ्यायचा आज रेल्वेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्यामुळेच रेल्वेत आज भयानक गुन्हेगारी वाढली आहे. रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवून घातपात घडविले जात आहेत. सहा वर्षांपूर्वीच्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेने २३ निरपराध प्रवाशांचा बळी घेतला. त्यात घाटकोपर येथे राहणारी सी.ए. होऊन अॅक्सिस बँकेत नोकरीला लागलेली २४ वर्षांची हिलोनी डेढ़िया, नुकतेच लग्न ठरलेली व कामगार कल्याण केंद्रात अधीक्षक म्हणून काम करणारी ३५ वर्षीय मीना दिगंबर वालेकर, ९ महिन्यांचा व ६ वर्षाचा मुलगा असलेली तेरेसा रिचर्ड फर्नाडिस तसेच सोमलता शेट्टी, सुजाता अल्वा आदी महिलांचा मृतांमध्ये समावेश होता. अशा मृत प्रवाशांच्या करुण कहाण्या ऐकल्या तर अंगावर काटा उभा राहतो. मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत रोज एका तरी नोकरदार तरुण महिलेचा रेल्वे अपघातात बळी जात आहे. या फारच वेदना देणाऱ्या घटना आहेत. मुंबईच्या लोकल अपघातात दरवर्षी अनेक महिला प्राण गमावत असतात. त्यामुळे बऱ्याच महिलांची मुले पोरकी व निराधार होत असतात. अनेक मुले आपले वडील गमावत असतात. हे दुष्टचक्र न थांबणारे आहे. मुंब्रा दुर्घटनेने तेच सिद्ध केले आहे.
5 वर्षांपूर्वी दै. ‘सामना’ने एक लेख प्रसिद्ध करून रेल्वे मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगली होती. तरीही निगरगट्ट, गेंड्याची कातडी असलेल्या सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. मुंब्रा अपघातानंतर तो होईल, असेही वाटत नाही.





























































