अतिवृष्टी अनुदान वाटपात 35 कोटींचा घोटाळा; 25 तलाठी दोषी, तहसीलदार, नायब तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

अंबड व घनसावंगी तालुक्यांत अतिवृष्टी अनुदान वाटपात 34 कोटी 97 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे प्रशासनाने केलेल्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 25 तलाठी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर तूर्तास निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी सुरु आहे. त्यात दोषी आढळून आलेल्या दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी महाडिक, सूत्रावे, शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती. डॉ. पांचाळ म्हणाले की, अतिवृष्टी अनुदान वाटपात अंबड व घनसावंगी तालुक्यात 75 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 54 अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 20 अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले होते. या समितीत 1 तहसीलदार, 6 नायब तहसीलदार, 15 ग्राममहसूल अधिकारी, व काही महसूल सहायकाचा समावेश होता.

या समितीने दोन्ही तालुक्यातील 1 लाख 73 हजार शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तपासले, आणि मंगळवार, 10 जून रोजी 72 पानांचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या समितीने 2022 ते 2025 म्हणजेच आजपर्यंतचे ई-पोर्टल, 8 अ उतारे, ऑफलाईन व ऑनलाईन सर्व कागदपत्रांची तपासणी केली. आरोपानुसार 75 कोटींचा अपहार झाल्याचे सांगण्यात येत होते. यापैकी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती 72 कोटी रकमेचे पुरावे मिळाले असून त्यानुसार अंबड तालुक्यात 15 कोटी 93 लाख १12 हजार व घनसावंगी तालुक्यात 19 कोटी 3 लाख 91 हजार असा एकूण 34 कोटी 97 लाख रुपयांचे अनुदान वाटपात अपहार झाल्याचे उघड झाले आहे. अद्याप 7 कोटी रुपयांच्या अनुदान वाटपाची चौकशी सुरु असल्यामुळे त्यात काही आढळून आल्यास अपहाराच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

अंबड तालुक्यातून 3 कोटी 20 लाख, तर घनसावंगी तालुक्यातून 2 कोटी रुपये वसुली करून अशी एकत्रित 5 कोटी 74 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून ती शासनाकडे जमा करण्यात आली असल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. चौकशी समितीने 8 अ उताऱ्यात नाव नसणे, दुबार वाटप, बोगस क्षेत्रवाढ, शासकीय जमिनीवर अनुदान वाटप करणे अशा कॅटेगरीनिहाय अहवाल सादर केला. याशिवाय व्यक्तीनिहाय अपहाराची रक्कम सुद्धा सादर केल्या आहेत. यात अंबड तालुक्यातील 6 तर घनसावंगी तालुक्यातील 3 क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे 1 कोटी रुपयापेक्षा जास्तीची रक्कम निघाली आहे.

अंबड मध्ये 75 लाख ते 1 कोटी पर्यंतच्या रक्कम असलेले 2 अधिकारी तर घनसावंगी तालुक्यात 1 अधिकारी आढळून आले आहे. अंबड तालुक्यात 10 लाखापेक्षा जास्तीची दुबार रक्कम वाटप करण्यात आल्याचे तपासणी अहवालात उघड झाले आहे. अजून चौकशी सुरूच असून याप्रकरणी कारवाया करण्याचे सत्र सुरु असल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. तसेच उर्वरित सहा तालुक्यातील अनुदान वाटपची चौकशी सुरु असून, येत्या 3-4 आठवड्यात अहवाल सादर होईल असे त्यांनी सांगितले.