
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध माझ्या फोनमुळे थांबल्याचा दावा केल्यानंतर काँग्रेसने सरकारवर हल्ला चढवला. ट्रम्प यांनी 13 वेळा वेगवेगळ्या प्रसंगी युद्धबंदी मीच केली असल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दाव्यांबद्दल कधी बोलणार आहेत का? ट्रम्प वारंवार बोलत असले तरी मोदी यांचे मौन कायम आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि पक्षाचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ पोस्टमधून केली.
अहमदाबाद विमान अपघातामुळे देश दुःखात असताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तानची युद्धबंदी केल्याचा दावा केला. आपले पंतप्रधान यावर किती काळ मौन बाळगणार? पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेच्या सैन्य दिनासाठी आमंत्रित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. ही बातमी राजनैतिक तसेच धोरणात्मकदृष्टय़ा हिंदुस्थानसाठी मोठा धक्का आहे, असेही जयराम रमेश यांनी नमूद केले.
हिंदुस्थानच्या राजनैतिकतेला तीन मोठे धक्के
जयराम रमेश पुढे म्हणाले की, हिंदुस्थानच्या राजनैतिकतेला अमेरिकेकडून तीन मोठे धक्के बसले आहेत. यामुळे आपल्या अमेरिकन धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. यापूर्वी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिल्ला यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध महान मित्र असे संबोधले होते. त्यात अमेरिकन सैन्य दिनासाठी असीम मुनीर यांना आमंत्रित केले. हा तोच असीम आहे ज्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी भडकाऊ आणि फूट पाडणारे विधान केले होते. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ताजे विधान केले की, हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धबंदी ट्रम्प यांच्यामुळेच शक्य झाली.