
मिंधेचे वादग्रस्त माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गाजावाजा करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पाच शववाहिन्या अलिबाग येथे धूळखात पडून आहेत. या शववाहिन्या मिळाल्या असल्या तरी त्यांचा वापर करण्याची मार्गदर्शक तत्त्वे जिल्हा परिषदेला सरकारकडून मिळालेली नाहीत. त्यामुळे या शववाहिन्या आरोग्य विभागाने कुंटे बाग परिसरात उभ्या केल्या आहेत. अनेक दिवसांपासून वापराविना पडून असल्यामुळे शववाहिन्यांच्या बॅटऱ्या उतरून टायर पंक्चर झाल्याने मिंधेंच्या चमकोगिरीचा पुरता बॅण्ड वाजला आहे.
मिंधे सरकारच्या कार्यकाळात राज्यात शववाहिन्या मिळाव्यात यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ३५० कोटी रुपये निधीची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारने केवळ ३५ कोटी रुपये मंजूर करीत राज्याच्या तोंडाला पाने पुसली. या अपुऱ्या निधीचा सावंत यांनी मोठा गाजावाजा करून त्यातून आयशर कंपनीकडून १०० अत्याधुनिक शववाहिन्या खरेदी केल्या. त्यापैकी पाच शववाहिन्या रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. या शववाहिन्यांचे वाटप जरी झाले असले तरी त्याचा वापर करण्याची मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारने जिल्हा परिषदेला अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने या शववाहिन्या कुंटे बाग येथे उभ्या करून ठेवल्या आहेत. या वाहनांचा वापर होत नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वच वाहनांच्या बॅटऱ्या पूर्णपणे उतरल्या आहेत. काही वाहनांचे टायर पंक्चर झाले आहेत. सरकारच्या या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
15 तालुके असलेल्या रायगड जिल्ह्यासाठी केवळ पाच शववाहिन्य प्राप्त झाल्या आहेत. शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाला या शववाहिन्यांचे वाटप करावे लागणार आहे. इतक्या कमी शववाहिन्या मिळाल्यामुळे त्यांचे वाटप करताना जिल्हा आरोग्य विभागाची कसोटी लागणार आहे. कोणत्या तालुक्याला या शववाहिन्या द्यायच्या याबाबत आरोग्य विभागात गोंधळ उडाला आहे. शासकीय शववाहिन्या उपलब्ध नसल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना नको तेवढे भाडेही मोजावे लागत आहे.
मार्गदर्शक तत्त्वानंतर वाटप
रायगड जिल्हा परिषदेला पाच शववाहिन्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून मिळाल्या आहेत. मात्र त्याच्याबाबत आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वे अजून प्राप्त झालेली नाहीत. शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर या शववाहिन्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया रायगडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.
घंटागाडी वर्षभरापासून बंद
चौक : खालापूर तालुक्यातील नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील घंटागाडी गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी एच.पी. सियल कंपनीने नावंढे ग्रामपंचायतीला नवी कोरी घंटागाडी दिली होती. या घंटागाडीने सुरुवातीला काही दिवस गावागावात फिरून कचरा गोळा केला. मात्र त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे घंटागाडी वर्षभर बंद आहे.