वेब न्यूज – अमेरिकेला होता स्वतःच्या अणुबॉम्बपासून धोका

इस्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेने अचानक उडी घेतली व इराणच्या नतांज, फोर्डो, इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर यशस्वी हल्ला केल्याचा दावादेखील केला. इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणे हा या हल्ल्याच्या प्रमुख उद्देश होता. अणुबॉम्बची ताकद चांगली ओळखून असलेली आणि हिरोशिमा, नागासाकीला उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वात प्रथम अणुबॉम्बचा वापर करणारी अशी ही बलाढय़ अमेरिका एकेकाळी स्वतःच्याच अणुबॉम्बमुळे धोक्यात सापडली होती.

50-60 च्या दशकात अणुबॉम्ब बनवण्याची मोठी स्पर्धा सुरू झाली होती. 1961 च्या 23-24 जानेवारी रोजी अमेरिकेचे एक बी-52 विमान उत्तर कॅरोलिनावरून उडत होते. मात्र विमानात अचानक काहीतरी बिघाड निर्माण झाला आणि ते अनियंत्रित झाले. अशा परिस्थितीत विमानात ठेवलेले 2 मार्क-39 अणुबॉम्ब जमिनीवर कोसळले आणि दुर्दैवाने त्यातील एका बॉम्बमध्ये डिटोनेशची प्रक्रियादेखील सुरू झाली. अर्थात बॉम्ब फुटण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुदैवाने हा बॉम्ब फुटला नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली. माध्यमात आलेल्या काही बातम्यांनुसार डिटोनेशनची प्रक्रिया सुरू झालेल्या बॉम्बमधील एक कमी व्होल्टेजचा स्वीच अचानक बंद पडला आणि त्यामुळे पुढची प्रक्रिया बंद पडली व ही भीषण दुर्घटना टळली. पुढे अमेरिकेच्या वायुसेनेच्या सैनिकांनी जमिनीच्या आत खोल खड्डा करून पडलेला हा बॉम्ब सुरक्षित बाहेर काढला. असे सांगतात की, या बॉम्बची क्षमता हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बच्या तुलनेत 260 पट जास्ती होती. जर हा बॉम्ब फुटला असता तर काय अनर्थ घडला असता याची कल्पना यावरून करता येईल. अमेरिकेने ही घटना त्या वेळी स्वीकारली होती. मात्र ती सार्वजनिक केली नव्हती. मात्र 2013 साली अमेरिकेने सार्वजनिक केलेल्या काही गुप्त कागदपत्रांमुळे ही घटना उघड झाली. या अपघातात दोन क्रू मेबर्सला आपला जीव गमवावा लागला होता आणि विमानदेखील नष्ट झाले होते.