अहमदाबादेत डीजेच्या आवाजाने हत्ती उधळला,जीव वाचवण्यासाठी भाविक सैरावैरा पळाले

अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेदरम्यान डीजे आणि शिट्टय़ांच्या आवाजाने एक हत्ती अस्वस्थ झाला आणि नियंत्रणाबाहेर गेला. अचानक उधळलेला हा हत्ती तब्बल 100 मीटरपर्यंत धावला. त्यामुळे भाविक जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावले. हत्तीने बॅरीकेड्स तोडले. यात एकजण जखमी झाला. वनविभागाच्या अधिकाऱयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हत्तींवर नियंत्रण मिळवले. या घटनेने भाविकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून सध्या तीन हत्तींना रथयात्रेतून बाजूला करण्यात आले आहे. यात दोन मादी तर एक नर हत्ती आहे. रथयात्रेतील सजवलेले हत्ती नेहमीच भाविकांसाठी आकर्षण राहिले आहे.

यंदा अहमदाबाद जिह्याच्या पशुसंवर्धन विभागाने रथयात्रेत सहभागी असलेल्या सर्व हत्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 23 जूनपासूनच हत्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सर्व हत्तींना फीट असल्याची प्रमाणपत्रेही देण्यात आली होती.