केईएम रुग्णालयातील गैरसोयी दूर करा! शिव आरोग्य सेनेची मागणी

रुग्णांसाठी बंद केलेली पीबीसीएफची सुविधा, अपघात विभागात डॉक्टरांसह स्टाफची असलेली कमतरता, प्रत्येक वॉर्डमध्ये बेडच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांची होणारी गैरसोय अशा विविध समस्यांसंदर्भात शिव आरोग्य सेनेने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांची भेट घेतली. रुग्णालयातील गैरसोयी दूर करा, अशी मागणी यावेळी केली.

शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेनेच्या वतीने शनिवारी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेऊन रुग्णांना येणाऱया अडचणींचे निवेदन दिले. यावेळी मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. मोहन देसाई, स्टोअरचे डॉ. राणा यांच्यासोबत चर्चा केली.

यावेळी मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, मुंबई सचिव ज्योती भोसले, विधानसभा अध्यक्ष फार्मसी सेल भांडुप स्वप्नील शिनकर, प्रवीण ढवळे, विनायक कानसकर, सहसमन्वयक जयश्री चौधरी, मथुरा टमाटा, स्नेहा खानविलकर, रवींद्र बाचनकर, विकास भोसले, अनंत कोटकर, दर्शन पाटकर, नंदकुमार बागवे, राजाराम झगडे, संदेश कोटेकर, अक्षया चव्हाण, गुलाब ठाकूर, सुरेखा गुसाई, संगीता सावंत, तारामती सिंहगिल, लितेश केरकर उपस्थित होते.

सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन

केईएममध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी बंद असलेली पीबीसीएफ सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अपघात विभागात स्टाफची अपुरी संख्या तसेच रुग्णांना नेण्यासाठी ट्रॉली आणि व्हीलचेअरचा तुटवडा, प्रत्येक वॉर्डमध्ये बेडची अपुरी संख्या, बंद पडलेल्या लिफ्ट, सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता, सीव्हीटीसी इमारतीत बंद असलेले ऑपरेशन थिएटर लवकर सुरू करावे, नातेवाईकांच्या सोयीसाठी रुग्णालयात झेरॉक्स मशीन उपलब्ध करून द्यावी आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी दिले.