अहमदाबाद अन् मेलबर्न स्टेडियमही सर्वोत्तम, डब्ल्यूटीसी फायनलसाठी अन्य देशांचाही विचार व्हावा

कसोटी क्रिकेटच्या विकासासाठी इंग्लंड हा चांगलाच देश आहे, यात वादच नाही. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया हे देशदेखील उत्तमच आहेत. त्यामुळे आगामी काळात ‘डब्ल्यूटीसी’ फायनलसाठी या देशांचाही विचार व्हायला हवा, असे मत टीम इंडियाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

गेल्या सहा वर्षांत सतत तीन डब्ल्यूटीसी फायनल इंग्लंडमध्ये तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे या तिनही फायनलमध्ये इंग्लंडचा संघ नव्हता. पहिली डब्ल्यूटीसी फायनल हिंदुस्थान-न्यूझीलंडमध्ये, तर दुसरी फायनल हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामध्ये झाली. तिसरी डब्ल्यूटीसी फायनल दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली. यात दक्षिण आफ्रिकेने जग्गजेतेपद पटकावित तब्बल 27 वर्षांपासून विजेतेपदाचा दुष्काळ संपविला.

लंडनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी बघायला मिळत असते. मात्र, आगामी काळात ‘डब्ल्यूटीसी’ फायनल नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) किंवा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (ऑस्ट्रेलिया) येथे केले जाऊ शकते, असे शास्त्राr यांना वाटते.

‘विझयोन क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये शास्त्राr म्हणाले, ‘मला वाटतं ‘डब्ल्यूटीसी’ फायनलच्या लोकप्रियतेसाठी सुरुवातीला लॉर्डस् मैदान नक्कीच योग्य ठिकाण आहे. मात्र, एकदा लोकप्रियता मिळाली की, ‘डब्ल्यूटीसी’ फायनलचे आयोजन इतर देशांतही करता येईल. मात्र, या स्पर्धेच्या फायनलसाठी अहमदाबादचे स्टेडियम हादेखील एक सर्वोत्तम पर्याय असेल. हिंदुस्थानचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, ‘अहमदाबाद डब्ल्यूटीसी फायनलसाठी एक उत्तम मैदान होऊ शकते. लॉर्डस् मैदानावर एक लाखापेक्षा जास्त आसन क्षमता नाहीये. त्यामुळे लाखभर आसन क्षमता असलेल्या अहमदाबादच्या मैदानावर नक्कीच डब्ल्यूटीसी फायनलसाठी मोठी गर्दी होऊ शकते.

अलीकडच्या रिपोर्टस्नुसार इंग्लंडच पुढील दोन डब्ल्यूटीसी फायनलचे  (2029 व 2031) आयोजन करण्याच्या यादीत पुढे आहे. आयसीसीच्या आगामी कार्यक्रमानुसार, 2027 च्या डब्ल्यूटीसीची फायनल लंडनमध्ये होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, आयसीसीने कसोटी क्रिकेटला सातत्याने पाठिंबा दिल्यामुळे इंग्लंडची बोली मागील वर्षीच नाकारली होती. त्यामुळे पुढील डब्ल्यूटीसी फायनल लॉर्डस् किंवा ओव्हल नव्हे तर मोदी किंवा मेलबर्न स्टेडियमवर रंगली तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.