
भुयारी मेट्रो-3 मार्गिकेच्या विधान भवन स्थानकात उद्घाटन होण्याआधीच पाणी गळती सुरू झाली आहे. विधान भवन इमारतीला खेटूनच असलेल्या या स्थानकातील लिफ्टच्या भागाला प्लॅस्टिक गुंडाळण्याची वेळ आली आहे. तसेच खोदकामाचे हादरे बसल्याने विधान भवनाच्या मागील रस्ता खचण्याचीही भीती आहे. भुयारी मेट्रो स्थानकाचे काम योग्य पद्धतीने न केल्याचे यातून उघड झाल्याने महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे.
यंदाच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोचे आचार्य अत्रे चौक स्थानक पाण्याखाली गेले. त्यापाठोपाठ वरळी स्थानकात पाणी गळती झाली. नंतर गिरगाव स्थानकाजवळील रस्ता खचला. हे सत्र सुरू असताना विधान भवन स्थानकाचीही तीच दशा असल्याचे उजेडात आले आहे. स्थानकाचे उद्घाटन होण्याआधीच आतील भागात पाणी गळती सुरू झाल्याने मेट्रो प्रशासनाला स्थानकाच्या बाहेरील भागाभोवती प्लॅस्टिक गुंडाळावे लागले आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ताही खचण्याची भीती आहे. चक्क विधान भवन मेट्रो स्थानकाच्या परिसराची उद्घाटनापूर्वी ही दुर्दशा झाल्याने महायुती सरकारच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.