गुजरातमध्ये विजयानंतर 72 तासांत ‘आप’ने केली आमदाराची हकालपट्टी

गुजरातमधील विसावदर विधानसभा पोटनिवडणूक जिंकून भाजपला धक्का देणाऱ्या आम आदमी पक्षाचा आनंद क्षणिक ठरला आहे. विसावदरमधील विजयानंतर 72 तासांतच पक्षाचे बोतडचे आमदार उमेश मकवाना यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ‘आप’ने मकवाना यांना पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.

मकवाना हे 2022 च्या निवडणुकीत आपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांची पक्षाचे विधानसभेतील व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत राजकारणामुळे ते त्रस्त होते. त्यातून त्यांनी पक्षावर आरोप केले. ‘भाजप, काँग्रेसप्रमाणेच आम आदमी पक्षातही उच्चवर्णीयांना झुकते माप दिले जाते. मागास समाजातील लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. ओबीसी व मागास कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकांसाठी वापर केला जातो, असा आरोप मकवाना यांनी केला. या आरोपांनंतर त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. मकवाना यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातमध्ये बस्तान बसवू पाहणाऱ्या ‘आप’ला धक्का बसला आहे.