
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह खात्याच्या सुस्त कारभाराच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या. पुणे जिह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगने आज पहाटे थेट पंढरपूरच्या पवित्र वारीत हैदोस घालत वारकऱ्यांना लक्ष्य केले. वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावून त्यांना लुटले. महाराष्ट्रात कधी नव्हे तो असा प्रकार घडल्यामुळे वारकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बा विठ्ठला, महाराष्ट्रात हे काय चाललंय? वा रे फडणवीसांची लॉ अँड ऑर्डर!’ असा संताप राज्यभरात व्यक्त होत आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळ आज ही हादरवून टाकणारी घटना घडली. पुण्याहून 7 जणांचे वारकरी कुटुंब मोटारीने पंढरपूरला निघाले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास स्वामी चिंचोली येथे ते चहापाण्यासाठी थांबले होते. त्या वेळी दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले. त्यांच्याकडे धारदार कोयते होते. काही कळण्याच्या आत त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावले. महिलांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील दीड लाखांचे दागिने लुटले. त्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस म्हणताहेत, आरोपीचा माग काढतोय!
पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारे मोटारचालक चहा पिण्यासाठी स्वामी चिंचोली गावाजवळ थांबले होते. त्यावेळी सोमवारी पहाटेच्या सुमारास कोयताधारी दोघा चोरटय़ांनी महिलांना धमकावून त्यांचे दागिने लुटले आहेत. तसेच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आरोपींचा माग काढला जात आहे, असे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
वारकऱ्यांना लुटणारे कोयता गँगवाले एवढय़ावरच थांबले नाहीत. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या त्या कुटुंबातील 17 वर्षांच्या मुलीवर त्यांनी अत्याचार केले. या मुलीला मोटारीतून ओढून चहाच्या टपरीच्या मागील नाल्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
पुणे जिह्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारी फोफावली आहे. पुणे जिह्यातील अनेक भागांत कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. कोयताधारी टोळक्यांकडून लूटमार व हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. अवैध व्यवसायांनी धुमाकूळ घातला असून हे सगळे रोखण्यात पोलीसही हतबल आहेत. महिलांसह शाळकरी विद्यार्थिनीही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी या गुन्हेगारांना चाप लावावा, अशी मागणी होत आहे.