
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या स्पर्धेत उतरण्याची तयारी आता मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे. एआयसाठी झुकरबर्ग यांनी सुपर इंटेलिजन्स लॅब्सची घोषणा केली आहे. याचा उद्देश आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सला डेव्हलप करणे असून ही नवीन एआय सिस्टम केवळ मानवाप्रमाणे विचार करण्यात सक्षम नसेल, तर त्याच्यापेक्षा चांगले प्रदर्शनसुद्धा करू शकेल. मार्क झुकरबर्ग यांनी एआयच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याने ओपनएआय आणि गुगलचे टेन्शन वाढले आहे.
मेटाची ही नवीन लॅब भविष्यासाठी सुपर इंटेलिजन्स एआय टुल्स विकसित करणार आहे. यामुळे मानवाप्रमाणे विचार करणे किंवा त्याच्यापुढे जाऊन काम करणे हे शक्य होणार आहे. मेटा सुपर इंटेलिजन्स लॅब्सची जबाबदारी स्केल एआयचे माजी सीईओ अॅलेक्झांडर वांग यांच्याकडे सोपवली आहे. ते आता मेटाचे चीफ एआय ऑफिसर म्हणून काम करतील. वांग यांच्या मोठ्या अनुभवामुळे या मिशनला एक नवीन उंची प्राप्त होईल, असे बोलले जात आहे. वांग यांच्यासोबत गिटहबचे माजी सीईओ नेट फ्रिडमॅन हेसुद्धा या टीममध्ये दिसतील.
फ्रिडमॅन हे एआय उत्पादनांच्या विकासावर फोकस करतील. या दोन्ही दिग्गज व्यक्तींमुळे मेटाचे हे मिशन एका नव्या युगात घेऊन जाईल. मार्क झुकरबर्ग हे स्वतः या मिशनच्या भरती प्रक्रियेसाठी पुढाकार घेत आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी कंपन्यांतील टॉप टॅलेंट्सला आकर्षक पॅकेज देऊन आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतले आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी दावा केला होता की, मेटाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना 100 मिलियन डॉलरपर्यंत ऑफर देऊन घेतले आहे, परंतु हा दावा मेटाच्या सीटीओने फेटाळला होता.
एआय स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक
मेटाने नुकतेच डेटा लेबलिंग स्टार्टअप स्केल एआयमध्ये 14.3 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याशिवाय मेटाने पर्ल प्लेक्सिटी एआय आणि रनवे यासारख्या स्टार्टअप्ससोबतसुद्धा चर्चा सुरू केली आहे. लवकरच प्लेएआय नावाच्या छोट्या एआय कंपनीला खरेदी केले जाऊ शकते. मेटाने ओपनएआय, एंथ्रोपिक आणि गुगल यासारख्या कंपन्यांच्या 11 टॉप एआय रिसर्चर्सला आपल्या सोबत जोडले आहे.