लातुरात शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

लातूर तालुक्यातील ढोकी येळे येथे शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकास शेतकर्‍यांनी जमीन मोजू दिली नाही. मोजणी न करताच भूसंपादन अधिकारी लातूर यांच्या पथकाला परत फिरावे लागले. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी तीव्र भूमिका घेत असून, ठिकठिकाणी विरोध केला जात आहे.

पवनार ते पत्रा देवी या महामार्गास शक्तीपीठ महामार्ग संबोधन राज्यशासन कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग पूर्ण करण्याच्या प्रयत्न आहे. मात्र राज्यात सर्वत्र याला तीव्र विरोध सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील हा विरोध केला जात असून, शासनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत. लातूर तालुक्यातील ढोकी येळी येथे भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यांच्यामार्फत भूसंपादन मोजणी करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख लातूर या कार्यालयाचे पथक मोजणीसाठी हजर झाले होते. मात्र शेतकर्‍यांनी विरोध केल्यामुळे त्यांना मोजणी करता आली नाही. मोजणी न करता हे पथक परत फिरले.

लातूर जिल्ह्यात 582 हेक्टर जमिनीचे भूसंपादन, शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. याला शेतकर्‍यांचा जोरदार विरोध राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय. सरकारमधील काही मंत्र्याच्या अट्टाहासापोटी हा महामार्ग केला जातो आहे याचा सर्वसामान्यांना कुठलाही स्वरूपाचा फायदा होणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी मांडलेली आहे.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात याव, कारण या महामार्गाला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी महामार्ग सध्या अस्तित्वात आहे. लातूर जिल्ह्यातील, तसेच डोके गावातील जमिनी या बागायती असून, मांजरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील आहेत. आमची कायमस्वरूपी उपजीविका ही शेतीवर अवलंबून असून, शेती गेल्यानंतर आम्ही जगू शकत नाही, असे या शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. या महामार्गामुळे या भागातील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे ती पर्यावरणासाठी घातक आहे. तसेच या भागातील सर्व शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत, असेही शेतकरी म्हणत आहेत.

बाळासाहेब रामभाऊ शिंदे, संजय विकास शिंदे, राहुल अशोक शिंदे, आप्पासाहेब नामदेव शिंदे, शिवरुद्र लालासाहेब शिंदे, अमोल माणिक शिंदे, ओम श्रीकृष्ण शिंदे, विकास प्रभाकर शिंदे, राहुल वसुदेव शिंदे, शामल सुभाष शिंदे, गोपीचंद बाळासाहेब शिंदे, महेश कोंडीराम शिंदे, अशोक ज्ञानदेव शिंदे, देविदास हरिश्चंद्र शिंदे यांच्यासह अन्य शेतकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.