
राज्यात झालेली अल्पवयीन मुलीची हत्या, नवजात बालकांची विक्री, महिलांची आर्थिक फसवणूक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने निधी हडप झाल्याचे आणि गृह प्रकल्पाच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याचे आज विधासभेत विविध तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
ठाणे जिह्यातल्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट नगरमधील एका दहा वर्षींय मुलाच्या क्रूर हत्येच्या संदर्भात भाजपच्या देवयानी फरांदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या अल्पवयीन मुलीला मारहाण, अत्याचार व धारधार शस्त्राने मानेवर वार करून सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना घडली. पण या गुह्यातील फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप आलेला नाही अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
पालघर जिह्यातील अर्नाळा गावातील आफ्रिदी खान या परप्रांतीय दलालाने मासे विव्रेत्या महिलांची एक कोटी रुपयांची फसवणूक करून पलायन केल्याच्या संदर्भात भाजपच्या स्नेहा दुबे यांनी प्रश्न केला होता. त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपीचा शोध घेतला, पण तो सापडला नाही.
बालकांची विक्री
बदलापूरमध्ये नवजात बालकांच्या विक्रीचे प्रकरण काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी मांडले. या परिसरात नवजात बालकांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे काय, असा प्रश्न केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे लेखी उत्तरात मान्य केले.
गृहखरेदीदारांची फसवणूक
शहापूर तालुक्यातील धसई व शहापूर येथील कर्म रेसीडेन्सी या गृह प्रकल्पाच्या नावाने अकरा हजारांहून अधिक खरेदीदारांची एक कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याबाबत शिवसेनेच्या मनोज जामसुतकर यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर संबंधितांची 19 कोटी 61 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ईडीने दिल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर डल्ला
उल्हासनगरमध्ये तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 4 लाख 75 हजार रुपयांच्या निधीवर डल्ला मारल्याच्या संदर्भात संतोष बांगर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात, 13 रुग्ण रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.