Monsoon Session – भरत गोगावले आणि भाजप आमदार अग्रवालांमध्ये विधान भवनाच्या व्हरांड्यात खडाजंगी, निधीवरून हमरातुमरी

महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि भाजपचे गोंदियामधील आमदार विनोद अग्रवाल यांच्यात विधान भवनाच्या व्हरांड्यात जाहीर खडाजंगी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. रोजगार हमी योजनेतील झालेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचा जाब अग्रवाल यांनी भरत गोगावले यांना विचारला.

गोंदिया मतदारसंघातील भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांनी विधान भवनाच्या आवारात रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खरीप भूविकास मंत्री भरत गोगावले यांच्यावर गोंदिया मतदारसंघातील रोजगार हमी योजनेतील झालेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचा उघड आरोप केला.

मंत्री व आमदार यांच्यातील ही खडाजंगी काही मिनिटे उघडपणे सुरूच होती. इतक्या महिन्यांत एकदाही गोंदिया जिह्याला पैसे दिले नाहीत. हे चालणार नाही. त्या अधिकाऱ्याची चौकशी करा. आमदार विनोद अग्रवाल हे मंत्री गोगावले यांना मोठ्या आवाजात सर्व सांगत होते. जर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही तर आम्ही संपूर्ण प्रकरण पत्रकारांसमोर ठेवू असे अग्रवाल यांनी सुनावले.

अग्रवाल यांचे म्हणणे काय आहे…

राज्यभरात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाचे सुमारे 4 हजार 185 कोटी रुपये अद्याप देण्यात आलेले नाहीत. यापैकी फक्त 1 हजार 379 कोटी रुपये वितरणासाठी जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गोंदिया जिह्याचे 407 कोटी रुपये थकीत आहेत. वाटप केलेल्या निधीतून आमच्या जिह्याला किमान 133 कोटी रुपये मिळायला हवे होते, परंतु गोंदिया जिह्याला एक पैसाही मिळालेला नाही. मी मंत्री गोगावले यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आमच्या गोंदिया जिह्यावर अन्याय झाल्याची भावनाही त्यांच्याकडे व्यक्त केल्याचे अग्रवाल म्हणाले.

ही संपूर्ण घटना विधान भवनाच्या आवारात उघडपणे सर्वांच्या समक्ष घडली. त्यामुळे पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. या प्रकारानंतर भरत गोगावले जरासे नरमले. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून एका अधिकाऱ्याला फोन केला आणि संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला.

रक्कम घेतल्यावर अधिकारी काम करतात

तो अधिकारी पूर्ण रक्कम घेतल्यानंतरच काम करतो असे त्यांनी सांगितले असे म्हणत संतप्त आमदार अग्रवाल मंत्री गोगावले यांच्यापासून दूर जाऊ लागले. त्यावर मंत्री गोगावले यांनी त्यांना बोलावून घेतले आणि म्हणाले की, अरे थांबा रे, जाऊ नकोस.