13 तासांत 11 ठिकाणी ढग फुटून हाहाकार, हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक अडकले

हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला असून 13 तासांत 11 जागी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून 13 लोक बेपत्ता झाले आहेत. महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले काही पर्यटकही हिमाचलमधील पुरामुळे तिथे अडकून पडले आहेत.

चंबा, हमीरपूर, मंडी जिह्यांसह अनेक भागांत पावसाने कहर केला आहे. या भागांत अनेक घरे कोसळली असून गोशाळा वाहून गेल्या आहेत. ठिकठिकाणी मदत व बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 500 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंह स्क्खू यांनी दिली आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये डोंगर खचला.

रस्ते बंद, पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा

राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन व दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाने बहुतेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. याचा फटका महाराष्ट्रातील पर्यटकांनाही बसला आहे. हिमाचलमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांमध्ये बहुसंख्य पर्यटक सातारा जिह्यातील असल्याचे सूत्रांकडून समजते.