
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे आपल्याच पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांना विधानसभेत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भक्कम पाठबळ दिले. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या जिल्ह्यात आणि भाजप वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांमधून सध्या विस्तवही जात नाही, एवढे टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे संधी मिळताच मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आज सभागृहात केला.
चंद्रपूर शहरात आकाशवाणीजवळ एका नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली. ही भिंत शंभर मीटर लांब असून 98 कोटी रुपये यावर खर्च झाले. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून ही भिंत जलसंपदा विभागाने बांधली. मात्र या भिंतीमुळे कुणाला संरक्षण मिळाले, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. आता याप्रकरणी आम आदमी पक्षाने आज लगेच चंद्रपुरात पत्रपरिषद घेत या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी दिशाभूल केल्याचा आरोप केलाय. त्यांनी जे उत्तर आज सभागृहात दिले, ते जिल्हाधिकाऱ्यांनीच तयार केले. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडेच चौकशीचे अधिकार कसे काय दिले जाऊ शकतात, असा सवाल करीत यावर आता SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि आधी जलसंपदा विभागाच्या अभियंत्याला निलंबित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.