अमेरिका, इस्रायलचे टेन्शन वाढले; इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी संबंध तोडले, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा मोठा निर्णय

अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करणार नसून या संस्थेशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इराण भविष्यात अणुबॉम्ब बनवण्याची शक्यता व्यक्त होत असून अमेरिका आणि इस्रायलचे टेन्शन आणखी वाढल्याचे चित्र आहे

इराणच्या आण्विक तळांमधील तब्बल 400 किलो शुद्धीकरण केलेले युरेनियम गायब झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. या युरेनियमच्या माध्यमातून 10 अणुबॉम्ब बनवता येतील असा दावाही अमेरिकेने केला होता. त्यामुळे ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी आज विविध देशांच्या आण्विक कार्यक्रमांवर देखरेख ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला.

नवीन नियमांनुसार इराणच्या अणुकेंद्राच्या सुरक्षिततेची खात्री मिळेपर्यंत तिथे पॅमेरे लावणे, तपासणीला परवानगी देणे आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला अहवाल देणे पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.

अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यामुळे इराणचे अणुबॉम्ब बनवण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला. परंतु, इराणने हा दावा फेटाळून लावला. इराणकडे अजूनही इतके साहित्य शिल्लक आहे की ते 9 अणुबॉम्ब बनवू शकतात, असे अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी म्हटले आहे.

संसदेत विधेयक एकमताने मंजूर

इराणच्या संसदेत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा आणि या संस्थेशी असलेले सर्व करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या विधेयकाला कामकाज सुरू होताच मंजुरी देण्यात आली. देशात शांततापूर्ण रीतीने अण्वस्त्र कार्यक्रम सुरू आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडून इराणच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवण्यात येत असून देशाचे हित धोक्यात आले आहे. त्यामुळे 1969 च्या कलम 60 अन्वये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी असलेले सर्व करार निलंबित करण्यात येत असल्याचे विधेयकात म्हटले आहे.