अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना मोक्का लावणार, चालू अधिवेशनात कायद्यात सुधारणा करणार

राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी सुरू आहे, हे लक्षात घेऊन तस्करी करणाऱ्यांना मोक्का लावला जाणार आहे. त्यासाठी या अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

मेफेड्रॉन तस्करीत तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे केंद्र बनले आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न परिणय फुके यांनी केला. एकनाथ खडसे यांनी मध्य प्रदेश, गुजरातमधून जळगावमध्ये अफू, गांजाची तस्करी होत असल्याचे सांगितले. यावर फडणवीस यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे भांगला परवानगी आहे, मात्र आपल्याकडे अफूला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

खटले फास्ट ट्रक कोर्टात चालवणार

तस्करीविषयीच्या गुह्यांबाबत खटला चालवण्यासाठी फास्ट ट्रक न्यायालये चालवण्यात यावीत, अशी विनंती उच्च न्यायालयाला करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.