आधी खोटे गुन्हे, मग फरार आणि आज भाजप प्रवेश; ‘भारतीय जमवा जमव पार्टी’ म्हणत संजय राऊत यांचं सणसणीत ट्वीट

विरोधकांवर बेछूट आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे, तुरुंगात टाकायची भीती दाखवायची आणि नंतर त्यांनाच पक्षात प्रवेश द्यायचा हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा राहिला आहे. अशीच भीती दाखवून भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातील दोन मोठे पक्षही फोडले. आमदार, खासदार फोडूनही भूक न भागलेल्या भाजपने आपला आता मोर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे वळवला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले आणि आता त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी एक्स (आधीचे ट्विटर) वर सणसणीत पोस्ट करत भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊत यांनी भाजपचा उल्लेख ‘भारतीय जमवा जमव पार्टी’ असा केला. सत्ता, पैसा आणि दहशत वापरून पक्ष फोडणाऱ्या भाजपचा बुरखाच राऊत यांनी फाडला.

“भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. त्यानंतर क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार (भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत. जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!”, असे ट्विट करत संजय राऊत यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.