
सांगली जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू असून, गुरुवारी सकाळी बुधगावमधील झेंडा चौकात क्षुल्लक कारणावरून मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. काल रात्री देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे पूर्वीच्या वादातून खून झाला होता. खुनाच्या मालिकेने सांगली जिल्हा हादरला आहे.
सिकंदर मौला शिकलगार (वय 52, रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. संशयित रफिक मेहबूब पट्टेकरी (वय 59, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत. शिकलगार सेंट्रिंगचे काम करतात, तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजुरीचे काम करीत होता. एका कामावरून दोघांत बुधवारी रात्री मारामारी झाली होती. त्याचा राग पट्टेकरीच्या डोक्यात होता. यातूनच गुरुवारी सकाळी पट्टेकरी हा धारदार चाकू घेऊन धुंद अवस्थेत झेंडा चौकात आला. त्याठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार याच्याशी वादावादी झाली. याच वादातून पट्टेकरी याने चाकूने शिकलगार यास भोसकले. यात जखमी शिकलगार याचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी पट्टेकरी यास ताब्यात घेतले असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे.