Chhatrapati Sambhajinagar Accident – डोळ्याचे पाते लवत नाही तोच भरधाव कारने 6 जणांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने शहरातील काळा गणपती मंदिराजवळ पाच ते सहा जणांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे अंगावर काटा येणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

शुक्रवारी सकाळी सिडको परिसरातील काळा गणपती मंदिरासमोर भरधाव कारने दर्शनासाठी येणाऱ्या पाच ते सहा नागरिकांना उडवले. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

नेमके काय घडले?

काळा गणपती मंदिराजवळ झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात स्पष्ट दिसतेय की, सकाळी वेळ असल्याने ज्येष्ठ लोक नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनाला येत होते. काही अघटीत घडेल अशी कल्पनाही कुणाला नव्हती. इतक्यात एक भरधाव कार येते आणि पापणी लवत नाही तोच रस्त्यावर उभ्या पाच ते सहा जणांना अक्षरश: चेंडूसारखे उडवते. यानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसतो.