
बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचे उत्तराधिकारी कोण असणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान हिंदुस्थानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दलाई लामा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावर चीन संतापला आहे. दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे, असे रिजिजू गुरुवारी म्हणाले होते. त्यावर तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर हिंदुस्थानने सावधगिरी बाळगावी, असे म्हणत चीनने शुक्रवारी रिजिजू यांच्या विधानावर नाक खुपसले.
केवळ दलाई लामा व त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेलाच तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक प्रमुख म्हणून त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे, असे विधान रिजिजू यांनी गुरुवारी केले. त्यांचे हे विधान चीनच्या दीर्घकाळापासूनच्या भूमिकेला छेद देणारे आहे. या पार्श्वभूमीवर चीनने हिंदुस्थानला प्रत्युत्तर दिले आहे. रिजिजू यांनी केलेल्या विधानांचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो. संभाव्य प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी हिंदुस्थानने आपल्या भाषेत आणि कृतीत सावधगिरी बाळगावी, असा इशारा चीनने दिला आहे.
रिजिजू यांच्या भूमिकेला परराष्ट्र मंत्रालयाने विरोध दर्शवला आहे. भारत सरकार श्रद्धा आणि धर्माच्या प्रथांबद्दल कोणतीही भूमिका घेत नाही किंवा बोलत नाही. सरकारने नेहमीच देशातील सर्वांसाठी धर्म स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. यापुढेही तशाच प्रकारे समर्थन केले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.