
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीतील शिवपूर क्षेत्रात विमानतळाकडे जाणाऱ्या व्हीआयपी रस्त्यावर तब्बल 15 फुटांचा खड्डा पडला आहे. पंतप्रधान मोदी हे दिवसभरात 18-18 तास काम करतात, असा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातो. मोदी यांच्या मतदारसंघात भररस्त्यात 15 फूट खोल आणि 12 फूट रुंद असा खड्डा पडला आहे, परंतु मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. पाऊस पडताच वाराणसीतील रस्त्याची झालेली दुरवस्था समोर आली आहे.
हा रस्ता विमानतळाकडे जाणारा असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते, परंतु ज्या वेळी हा खड्डा पडला, त्या वेळी सुदैवाने जवळपास वाहन नव्हते. त्यामुळे यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. रस्ता खचल्याची माहिती मिळताच परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी तत्काळ याची माहिती प्रशासनाला दिली. यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बांधकाम विभागाने तात्पुरती रस्त्याची डागडुजी केली आहे, परंतु स्थानिक लोकांनी आरोप केला आहे की, हा रस्ता बनवताना याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकदा तक्रार करूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही.