
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे रेल्वे कर्मचारीही आता मराठी भाषेचे धडे गिरवणार आहेत. पश्चिम रेल्वेचे प्रशासन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी स्थानकांत अमराठी कर्मचाऱ्यांचा टक्का अधिक आहे. तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना मराठी भाषा बोलता येत नसल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अधूनमधून वाद होतात. अशाप्रकारचे वाद टाळण्यासाठी आणि मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्याबाबत प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मराठी भाषेमध्ये वेगळाच गोडवा आहे. या भाषेने सर्व क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मराठीबद्दल आमच्या मनामध्ये नेहमीच आदराची भावना राहिली आहे. याच भावनेतून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना मराठी माणसांशी बोलताना मराठी भाषेत बोलण्यास सांगणार आहोत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी दिली.