
हिंदी सक्तीविरोधात आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंदीसक्तीचा विरोध करीत शासन निर्णयाची होळी करण्यात आली होती. यामुळे पोलिसांनी आंदोलक डॉ. दीपक पवार, संतोष शिंदे यांच्यासह 300 जणांवर आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पहिलीपासून हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी 29 जून रोजी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाजवळ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला शिवसेनेसह ‘मनसे’, काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, वंचित आदी पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. या वेळी हिंदी भाषेची सक्ती व ती सक्ती लादणाऱ्या राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली होती.
सरकारची आकसाने कारवाई
मराठीसाठी मोठ्या संख्येने मराठी जनता एकवटत असल्याचे चित्र पाहून राज्य सरकारला तो जुलमी शासन निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे सरकारने आकसाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. आझाद मैदानात गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये कृती समितीचे डॉ. दीपक पवार, संतोष शिंदे, संतोष घरात, वैभव मयेकर, शशी पवार, युगेंद्र साळेकर, संतोष वीर यांच्यासह 300 मराठी प्रेमींविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.