
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला असताना ‘मराठीद्वेष्ट्यां’कडून अजूनही ‘मराठी’ भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. यामध्ये आता उद्योजक सुशील केडिया यांनी देखील ‘मी मराठी शिकणार नाही, बोलणार नाही… काय करायचे ते करा’ असे मुजोर वक्तव्य केले आहे. ‘एक्स’वर पोस्ट करून ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टॅग केली आहे. केडियाच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
केडिया यांनी ‘एक्स’वर मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मागील 30 वर्षे मी मुंबईत राहतोय. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करीत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो आणि तुम्हाला काय करायचे ते करा’, असे मुजोर वक्तव्य केले आहे.
केडिया म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड – दानवे
केडिया यांनी केलेल्या मराठीद्वेषी वक्तव्याचा विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हा केडिया नाही तर महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, त्यामुळे सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. …आणि ‘हो, केडिया! या मग्रुरीचे उत्तर जरूर मिळेल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे
मराठी भाषेला आताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जो कुणी शिक्षण घेतो त्याला मराठी बोलता-लिहिता आले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांडली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मराठी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे आपण इंग्रजीत शिका किंवा इतर कोणत्याही माध्यमात शिका, त्यात मराठी असणारच. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुमच्या मुलांना मराठी शिकवले पाहिजे, असेही ते म्हणाले.