
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजणारा भाजप हा सध्या अण्णा द्रमुकला विधानसभा निवडणुकीनंतर तामीळनाडूच्या सत्तेत सामील करून घेण्यासाठी आर्जव करत आहे. मात्र अण्णा द्रमुक सत्तेवर आलाच तर ते सरकार फक्त अण्णा द्रमुकचेच असेल, त्यात भाजपला स्थान नसेल, असे अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी भाजपला ठणकावले आहे. तामीळनाडूत अप्रिय असलेल्या भाजपचे लोंढणे गळ्यात बांधायला अण्णा द्रमुकवाले तयार नाहीत.
तामीळनाडूत विधानसभा निवडणुका पुढील वर्षी असल्या तरी त्याची तयारी सत्ताधारी द्रमुक आणि विरोधी अण्णा द्रमुक यांनी आतापासूनच सुरू केली आहे. भाजपने अण्णा द्रमुकला हात पुढे केला आहे. मात्र अण्णा द्रमुक सावध आहे. भाजपचे सरकार तामीळनाडूत सत्तेवर येणार असा प्रचार जरी झाला आणि तसे नरेटिव्ह द्रमुकने सेट केला तर अण्णा द्रमुकचे गलबत गटांगळ्या खाईल, याची त्या पक्षातील नेत्यांना जाणीव आहे. जयललिता यांच्या निधनानंतर हा पक्ष निर्नायकी असला तरी भरकटलेला नाही. यावेळी सत्ता मिळाली नाही तर अण्णा द्रमुकपुढची आव्हाने वाढणार आहेत. त्यामुळे तामीळनाडूत अप्रिय असलेल्या भाजपचे लोढणे गळ्यात बांधायला अण्णा द्रमुकवाले तयार नाहीत. अमित शहा यांनी दोन वेळा ‘प्रपोज’ करूनही अण्णा द्रमुकचे ‘ना रे बाबा ना…’ असेच उत्तर आहे.
तामीळनाडूत पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. ‘द्रविडी अस्मिते’वर या निवडणुका लढविल्या जाण्याची चिन्हे आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्राने हिंदी लादण्याचा केलेला आगाऊपणा. हिंदीविरोधात तामीळनाडूत पहिल्यापासूनच वातावरण आहे. त्यात भाजपच्या या भाषिक, धार्मिक व सनातन भूमिकेचा फटका आपल्याला बसेल, याची अण्णा द्रमुकला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे ईडी वगैरेचा धाक म्हणून भाजपसोबत अण्णा द्रमुकने बळेबळे युती केली असली तरी सरकारात भाजपला स्थान नसेल, हे अण्णा द्रमुकचे नेते जनतेला पटवून देत आहेत. भाजपच्या हिंदी भाषिक, सनातन धोरणाला अण्णा द्रमुकचाही पाठिंबा आहे, असे नरेटिव्ह सेट झाले तर अण्णा द्रमुकचा बाजार उठलाच म्हणून समजा. त्यामुळे भाजपने कितीही आंखमचौली केली तरी अण्णा द्रमुक दाद देताना दिसत नाही. उलटपक्षी दिल्लीकरांना त्यांनी गुडघ्यावर आणले आहे. अन्नामलाई नावाच्या हिरोगिरी करणाऱ्या प्रदेशाध्यक्षाला अण्णा द्रमुकच्याच दबावामुळे भाजपला बदलावे लागले आहे. तामीळनाडूत अवस्था बिकट आहे हे लक्षात आल्यानंतर दिल्लीकरांनी ‘सिंदूर’ प्रकरणी विदेशात पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळात जाणीवपूर्वक करुणानिधी यांची कन्या कनिमोझी यांचा समावेश केला. द्रमुकच्या परिवारात अंतर्गत असंतोष आहे, तो एन्कॅश करण्याचा प्रयत्न यामागे होता. मात्र दौऱ्यावरून परतल्यानंतर कनिमोझी यांनी हिंदीविषयी भूमिका स्पष्ट केल्याने तूर्तास तरी भाजपच्या हाती भ्रमाचा भोपळा पडला आहे. द्रमुकमध्ये फूट पडेना, अण्णा द्रमुक काही केल्या बधेना आणि पक्षविस्तार होईना, अशा विलक्षण कोंडीत भाजप सापडला आहे. राजकारणात सगळेच दिवस काही सारखेच नसतात, याची अनुभूती आता कुठे भाजपला यायला सुरुवात झाली आहे. अण्णा द्रमुकसारख्या ‘नेतृत्वहीन पक्षा’ने भाजपला दिलेला नकार तरी हेच सांगतो.
टी. राजा सिंग यांचा झटका
भाजपचे सध्या ग्रहमान बदलले दिसताहेत. सलग अकरा वर्षे साम, दाम, दंड, भेदाच्या द्वारे निरंकुश सत्ता भोगलेल्या भाजपला आता घरघर लागली आहे. ताजा मसला तेलंगणामधील आहे. 2022 मध्ये महंमद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी करणारे भाजपचे आमदार आणि भाजपने ज्यांना ‘हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’ वगैरे बनवले होते त्या टी. राजा सिंग यांनी भाजपला ‘राम राम’ ठोकला आहे. तेलंगणामध्ये नुकतीच प्रदेशाध्यक्षांची निवड झाली. या निवडणुकीत राजा सिंग यांना बाजूला ठेवून रामचंद्र राव यांना प्रदेशाध्यक्ष नेमल्यामुळे हे हिंदुत्वाचे पोस्टरबॉय चांगलेच संतापले. त्यांनी तडकाफडकी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवून दिला. तेलंगणामध्ये माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष कधी फुटतो याकडे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या भाजपला राजा सिंग यांनी गळती लावली आहे. त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. भाजपात सध्याच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जात नाही. हितसंबंध जोपासण्याचे काम केले जाते. दिल्लीच्या नेत्यांना चुकीची माहिती दिली जाते, असे सांगत राजा यांनी तोफ डागली आहे. चंद्रशेखर रावांचा पक्ष एकतर फोडायचा किंवा त्यांच्या पक्षाचे विलीनीकरण करायचे, अशी गोड मनोरथे रचणाऱ्या भाजपला राजा यांच्या राजीनाम्याने धक्का बसला आहे हे खरे. राजा हे फक्त आमदार असले तरी त्यांच्या नावाला चांगलेच हिंदुत्ववादी म्हणून वलय प्राप्त होते. धार्मिक उन्माद वाढविणारी त्यांची भाषणे आणि वक्तव्ये गाजली होती. आता हे राजा महाराज पुढे काय करतात ते बघूयात.
खट्टर यांचा ‘एसी’
मनोहरलाल खट्टर हे विलक्षण विनोदी गृहस्थ आहेत. कोणताही राजकीय वकुब नसताना हे खट्टर महाशय हरयाणात दहा वर्षे मुख्यमंत्री राहिले आणि सध्या केंद्रात ऊर्जा खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे पंतप्रधानांशी असलेले ‘खिचडी मित्रा’चे संबंध. संघाचे पूर्णवेळ प्रचारक असताना मनोहरलाल हे मोदींना प्रेमाने खिचडी खाऊ घालायचे. त्याची उतराई म्हणून मोदींनी कोणाच्या नावीगावी नसलेले खट्टर यांना हरयाणाचे सीएम केले. त्यानंतर दहा वर्षे ज्या पद्धतीने खट्टरांनी हरयाणाचे शासन चालविले, त्यानंतर हरयाणात एक सार्वजनिक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली ती अशी, ‘भाईसाब, मोदीसाब का खिचडी हरयाने को बहोत महेंगा पडा…’ खट्टर यांची मुख्यमंत्रीपदावरून अचानक उचलबांगडी करून मोदींनी त्यांना केंद्रात मंत्री केले. मात्र दिल्लीतही त्यांच्या करामती सुरूच आहेत. एअर कंडिशन सिस्टिमचे तापमान 20 पेक्षा कमी व 28 पेक्षा जास्त करता येणार नाही असा कायदा आणू जेणेकरून मोठ्या प्रमाणावर वीज बचत होईल, असे बेफाम विधान करून खट्टरांनी कपिल शर्माच्या विनोदावरही मात केली. खट्टर यांच्यावर सोशल मीडियात सध्या विनोदाचे तुफान आले. आता या विनोदाच्या हास्यकल्लोळात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनीही हात धुऊन घेतले आहेत. खट्टरांसंदर्भातील विषयावर बोलताना त्यांनी ‘हा कायदा बहुधा 2050 नंतर अस्तित्वात येईल,’ असा टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2047 पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र होईल, हे सातत्याने सांगत असतात. एसीचा कायदा बहुधा आपले राष्ट्र विकसित झाल्यानंतरच येईल. बघूयात खट्टरांचा एसी कायदा कधी येतो ते.