
शेतकऱ्यांनी पावसामुळे पेरणी सुरू केली असून, दुसरीकडे खतांचा योग्य पुरवठा होत नाही. आज खतांची मागणी वाढली असून, पुरवठा कमी होत असल्याने शेतकरीवर्गामध्ये तीक्र संताप व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना युरिया मिळण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दुसरीकडे काळाबाजारात चढय़ा किमतीने खते मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गेल्या महिनाभरापासून जिह्यातून पाऊस गायब झाला आहे. अधूनमधून ऊन आणि सोसाटय़ाचा वारा यांमुळे जिल्हाभरातील पिके तहानली आहेत. जवळपास जून महिना कोरडा गेला असून, यामुळे अनेक ठिकाणी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची ओढाताण होताना दिसत आहे. विशेषकरून मोठा खर्च करून लागवडी केलेल्या कपाशी पिकाला पाणी देताना शेतकऱ्यांची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे.
यंदा उन्हाळ्याच्या शेवटी धो-धो पाऊस बरसला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पेरणी केली. आता महिना झाला, नुसते भिरभिरणारे वारे आणि ‘शॉवर’सारखा पाऊस यांमुळे पिके तहानली आहेत. त्यातच शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱया युरिया खतांचा तुटवडा झाला असून, युरियासाठी धावधाव सुरू आहे. युरिया मिळत नसल्याने शेतकरी बेजार असताना ज्या ठिकाणी युरिया खते उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी कृषी केंद्रचालकांकडून लिंकिंग करण्यात येत असल्याने बळीराजाची आर्थिक परवड सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने युरियाच्या काळाबाजारसह लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
नगर जिह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. यात राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपूर वगळता, उर्वरित जिह्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. यामुळे कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या नियोजनापैकी पाच लाख 15 हजार 750 हेक्टर म्हणजेच सरासरीच्या 72 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून पाऊस गायब झाला आहे. ढगाळ वातावरण असले, तरी सोसाटय़ाचा वारा आणि दमटपणा यांमुळे पिके तहानली असून, अनेक ठिकाणी भरपावसाळ्यात सूक्ष्म सिंचनाचा आधार घेत शेतकरी पिके जगविताना दिसत आहेत. अशात अनेक भागांत युरिया खतांची टंचाई असल्याची ओरड होत आहे. युरिया उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
दरम्यान, जिह्यात खरीप हंगामासाठी एक लाख 17 हजार मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 85 हजार 942 मेट्रिक टन युरियाचे आवंटन मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात 4 जुलैपर्यंत जिह्यात 57 हजार 581 मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून, मागील शिल्लक 24 हजार 401 मेट्रिक टन यातून एकूण 34 हजार 523 मेट्रिक टन युरियाची विक्री झालेली आहे. जिह्यात अजूनही 15 हजार 346 मेट्रिक टन युरिया शिल्लक असल्याचा दावा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे एकीकडे शेतकऱ्यांची युरिया खतटंचाईची ओरड, तर दुसरीकडे कृषी यंत्रणेकडून युरियाचा स्टॉक असल्याचा दावा केला जात असल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणारे, लिंकिंग करणाऱया कृषी केंद्रचालकांविरोधात तालुकास्तरावरील कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.