गरिबी वाढतेय, मोजक्याच धनदांडग्यांच्या हाती पैसा; गडकरींनी ‘सब का विकास’ उघडा पाडला

देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात गरीबांची संख्या वाढतेय आणि पैसा व संपत्ती मात्र काही मोजक्या श्रीमंतांच्याच हाती एकवटली आहे, असे जळजळीत वास्तव त्यांनी मांडले.

नागपूरमध्ये सीएच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी देशातील गरीब हळूहळू वाढत चालले आहेत आणि देशातील संपत्तीचे श्रीमंतांकडे केंद्रीकरण होत आहे, असे सांगितले. अर्थव्यवस्थेचे असे केंद्रीकरण होणे योग्य नाही, संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी सडेतोड भूमिकाही त्यांनी मांडली.

जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्र 22-24 टक्के तर सेवा क्षेत्राचे 52-54 टक्के योगदान आहे. 65 ते 70 टक्के ग्रामीण लोकसंख्या शेती करत असतानाही कृषी क्षेत्राचे जीडीपीमध्ये फक्त 12 टक्के योगदान असल्याचे ते म्हणाले.

गरीबांची गरिबी दूर करणारा, तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणारा आणि देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आता हिंदुस्थानला हवा आहे.त्यासाठीच नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.