
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्या दोस्तीचे रूपांतर आत दुश्मनीत झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका इलॉन मस्क यांना बसला आहे. मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली असून अवघ्या एका दिवसात 6.8 टक्के घसरण झाल्याने मस्क यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. बिग ब्युटिफूल बिल आणल्यामुळे मस्क आणि ट्रम्प या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. ट्रम्प यांना विरोध म्हणून मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाने नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचा मित्र अशी मस्क यांची ओळख होती, परंतु मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर आता उघडपणे टीका करायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांच्या आर्थिक अजेंड्याविरुद्ध उघडपणे मोर्चा खोलला आहे. ट्रम्प यांनी आणलेल्या बिग ब्युटिफूल बिलामुळे अमेरिकेचे आर्थिक नुकसान होणार असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे 3 ट्रिलियन डॉलरचे बजेट कमी होईल, अशी भीती मस्क यांनी वर्तवली आहे. 2024 च्या निवडणुकीतील ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि देणगीदार असलेल्या मस्क यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी (डॉज) चे प्रमुख पद सांभाळले होते. परंतु मे 2025 मध्ये ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर मस्क यांनी डॉजच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.