
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनादेश चोरीला गेल्याचा दावा करत, आता बिहारमध्येही असाच कट रचला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या फेरतपासणी प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या ‘बिहार बंद’ आंदोलनात ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी पटनामध्ये आयकर चौकापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाटण्यातील महात्मा गांधी सेतूवर टायर जाळून रस्ता अडवला, तसेच सचीवालाय हॉल्ट रेल्वे स्थानकावर रेल्वे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्रात जनादेश चोरीला गेला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाले होते, पण काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. डेटा विश्लेषणातून कळले की, तिथे एक कोटी नवीन मतदार जोडले गेले, जे एकूण मतदारांच्या 10 टक्के होते. आश्चर्याची बाब म्हणजे, हे सर्व नवीन मत भाजपला गेले. आता बिहारमध्येही असाच प्रकार घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”