ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांची दुसरी इनिंग, ऋषी सुनक बँकेत नोकरी करणार

ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन बँक गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंकमध्ये ते वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करणार आहेत. गोल्डमॅनचे सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक हे आता कंपनीच्या जागतिक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ते ग्राहकांना सल्ला देण्याचे काम करतील. खासकरून आर्थिक मुद्दय़ांवर आपला अनुभव शेअर करतील. दरम्यान ऋषी सुनक यांनी 2022 ते 2024 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. सुनक यांनी 2015 मध्ये संसद सदस्याच्या रूपाने राजकारणात पहिले पाऊल ठेवले. पंतप्रधान बनण्याआधी ते फेब्रुवारी 2020 ते जुलै 2022 पर्यंत ब्रिटनचे अर्थमंत्री (चान्सलर ऑफ एक्सचेकर) होते. त्याआधी त्यांनी निवास, स्थानिक सरकार आणि अर्थ मंत्रालयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. राजकारणात येण्याआधी त्यांनी न्यूयॉर्क येथील गोल्डमॅन सॅक्समध्येही काम केलेले आहे.

किती मिळणार पगार

गोल्डमॅन सॅक्समध्ये वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना साधारणपणे 1,36,000 डॉलर ते 2,20,000 डॉलरपर्यंत म्हणजेच 1.7 कोटी रुपये वार्षिक पगार दिला जातो. परंतु ऋषी सुनक हे हायप्रोफाईल असल्याने त्यांना किती पगार दिला जाईल, हे अद्याप उघड करण्यात आले नाही. 2000 साली त्यांनी एक ट्रेनी म्हणून बँकिंगमध्ये काम केलेले आहे.