
नितेश तिवारी यांचा बिग बजेट चित्रपट रामायणाची प्रदर्शनापूर्वीच जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 1600 कोटी रुपये असल्याची चर्चा असून या चित्रपटात रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला असून याला देशभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित असून दोन भागांत हा चित्रपट दाखवला जाणार आहे. पहिला भाग 2026 मध्ये दिवाळीत, तर दुसरा भाग 2027 मध्ये दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना फी म्हणून किती पैसे मिळाले, हेही आता समोर आले आहे.
कन्नडचा सुपरस्टार यश या चित्रपटात रावणची भूमिका साकारणार आहे. दोन्ही भागांसाठी यशला 100 कोटी रुपये दिले जाणार आहेत. रामायणात साई पल्लवी ही सीता मातेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी साई पल्लवीला 12 कोटी रुपये दिले जातील. रामायणात सनी देओल भगवान हनुमानच्या भूमिकेत दिसणार असून प्रत्येक भागासाठी 20 कोटी म्हणजेच एकूण 40 कोटी रुपये दिले जातील. टीव्ही स्टार रवी दुबे या चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. रवी दुबेला 4 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
‘रामायण’ चित्रपटात भगवान राम यांची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरला पहिल्या आणि दुसऱ्या भागासाठी प्रत्येकी 75 कोटी म्हणजेच एकूण 150 कोटी रुपये दिले जाणार आहेत.