
अहिल्यानगर जिल्ह्यातील रासायनिक खतांची माहिती आता कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात तालुकानिहाय प्रत्येक कृषी केंद्रात शिल्लक असणाऱ्या विविध रासायनिक खतांची माहिती उपलब्ध राहणार आहे.
या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रचालकाकडे खतांची मागणी करावी, तसेच खतांचा काळाबाजार अथवा लिंकिंग सुरू असल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी चार लाख मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने खरिप हंगामासाठी उपलब्ध झालेल्या विविध रासायनिक खतांचा साठा याबाबतची माहिती कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. जिल्ह्यात युरिया खताच्या उपलब्धता आणि टंचाईवर दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल खतांचा काळाबाजार व लिंकिंग रोखण्यासाठी करण्यात येत असल्याने उपाययोजनांची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात खरिप हंगामासाठी युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खते यांचा दोन लाख 24 हजार 146 मीटर खताची आवंटन मंजूर करण्यात आले होते. यापैकी एक लाख 46 हजार 780 मीटर खताचा पुरवठा झालेला असून यातील 73 हजार 163 खताची विक्री झालेली आहे. तर कृषी केंद्रचालकांकडे 97 हजार 155 मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक असल्याचे कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून आले. जिल्ह्यात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये, सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या गावात असणाऱ्या कृषी केंद्रातील खतांची उपलब्धता कळावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ब्लॉग स्पॉट तयार करण्यात आला आहे. या ऑनलाइन संकेतस्थळावरून मोबाईलवरूनदेखील लॉगिंग केल्यावर जिल्हा आणि तालुका निवडून त्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्याही कृषी केंद्रात दररोज उपलब्ध असणाऱ्या विविध कंपनीच्या खतांची उपलब्धता शेतकऱ्यांना कळणार आहे.
असा तपासता येणार खतांचा साठा
adonagarzp\blogspot.com संकेतस्थळावरून अथवा कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करून शेतकऱ्यांना मोबाईलवरून प्रत्येक तालुक्यात कृषी केंद्रनिहाय उपलब्ध असणाऱ्या खतांची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच खतांचा काळाबाजार अथवा लिकिंग होत असल्यास कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.