
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. आरोग्य विभाग झोपी गेल्याने शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून डेंग्यूमुळे 31 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विलास म्हात्रे असे मृत तरुणाचे नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरात राहत होता. गेल्या दिड महिन्यात डेंग्यूच्या 40 तर मलेरियाच्या 60 रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू आहेत. पावसाळ्यात साथ रोगांचा ‘ताप’ वाढल्याने केडीएमसी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
विलास म्हात्रे याला डेंग्यूची लागण झाल्याने 7 जुलै रोजी कल्याणमधील केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र कुटुंबीयांनी त्याला कल्याण पूर्वेकडेल एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने आज विलास म्हात्रे याचा मृत्यू झाला. पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मेपासून आतापर्यंत डेंग्यूचे 40 तर मलेरियाचे 60 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने म्हात्रे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. घरोघरी सर्वेक्षण आणि औषध, धूर फवारणी केली जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केले आहे.
दीड लाख घरांचे सर्वेक्षण
साथीच्या रोगांना आला घालण्यासाठी आतापर्यंत पालिका क्षेत्रातील दीड लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तीनशे ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या असून सर्व वाडति औषध फवारणी सुरू आहे. डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊ नये यासाठी नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारती आणि सोसायटी यांनादेखील स्वच्छतेसंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत.
खासगी हॉस्पिटल्स, लॅबकडून डाटा संकलन केडीएमसीकडून प्रत्येक साथीच्या संशयित रुग्णाचे सॅम्पल घेऊन ठाण्यात एलायझा टेस्ट केली जाते. खबरदारी म्हणून खासगी हॉस्पिटल्स, लॅब आणि डॉक्टरांकडून दररोजचा डाटा संकलित केला जात आहे. संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ त्या परिसरात तपासणी, सर्वेक्षण व फवारणी केली जात आहे. तसेच डेंग्यूच्या अळ्या स्वच्छ पाण्यात वाढत असल्यामुळे एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहनही पालिकेकडून केले आहे.