
विधिमंडळाचे अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रातोरात दिल्लीकडे धाव घेतली होती. त्यांच्या या दौऱ्याबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिंदेंनी त्यांचे गुरू अमित शहा यांची चरण पूजा केली. तसेच नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या तक्रारीही केल्या. एवढेच नाही तर मराठी माणसाची एकजूट झाली, तर आपल्याला राजकीय दृष्ट्या फार मोठे नुकसान होईल असे म्हणत हे नुकसान टाळायचे असेल तर मला मुख्यमंत्री करा. मी मुख्यमंत्री झालो तर सगळे थांबवेल, असेही म्हटले. मात्र शहांनी भाजपचाच मुख्यमंत्री राहील हे स्पष्ट केल्यावर शिंदेंनी मुख्यमंत्री केल्यास संपूर्ण गटच भाजपमध्ये विलिन करायची तयारी दर्शवल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, मिंधे गटाचे मुख्य नेते दिल्लीत आहेत. मग ते अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी. शिंदे हे पात्र किंवा त्यांचा गट याच लोकांनी निर्माण केला. त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतील. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिंदे 100 टक्के दिल्लीला जाणार होते. जाताना त्यांनी पूजा अर्चा करण्यासाठी सामान नेले आणि अमित शहांची गुरू म्हणून पूजा केली. त्यांच्या चरणावर डोके ठेवले. पायावर चाफ्याचे फुले वाहिली. दोन्ही पायाला चंदन लावले. मग ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली. ते आमची कोंडी करतात, काम करू देत नाहीत, आम्हाला अडचणीत आणताहेत, आमच्या आमदारांच्या चौकश्या लावल्या आहेत, अशा तक्रारीचा सूर त्यांचा होता.
मराठी एकजूट कशी तोडता येईल यावर चर्चा
महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट झाली आहे. ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काहीही करून यामध्ये तुम्हाला लक्ष घालावे लागेल. मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल आणि ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली. यावेळी शहांनी तुमच्या मनात काय आहे? असे विचारले. तेव्हा शिंदेंनी मला मुख्यमंत्री करणे हाच त्याच्यावरचा उपाय असल्याचे म्हटले. मी पुन्हा मुख्यमंत्री झालो तर सगळ्या गोष्टी थांबवेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य लाभेल हे त्यांनी शहांनी सांगितले. शहांनी मुख्यमंत्री भाजपचाच राहील हे स्पष्ट केल्यावर शिंदे यांनी संपूर्ण गट भाजपमध्ये विलिन करायला तयार आहे. पण मला मुख्यमंत्री करा असे म्हटले, असा दावाही राऊत यांनी केला.
शिंदेंच्या जवळच्या लोकांवर भविष्यात कारवाई
तसेच शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची कामाची पद्धत मला माहिती आहे. आयटीची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही. पण हा इशारा आहे. यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे संकेत आहेत. त्यामुळे या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असेही राऊत म्हणाले.
निवडणुकीआधी 95 हजार कोटींची कामे
लोक उत्फुर्तपणे बाहेर येत आहेत. वरळीनंतर मीरा-भाईंदरमध्ये लोक रस्त्यावर उतरले. राज्यात ठिकाठिकाणी या ठिणग्या पडताहेत. त्या आता कुणाला विझवता येणार नाहीत. ही भीती महाराष्ट्रातील सध्याच्या राज्यकर्त्यांना सतावतेय. पैशाचा अतोनात वापर होत आहे, हे खरे आहे. हजारो, लाखो कोटींची कामे ठेकेदारांना दिलेली आहेत आणि शिंदेंनी त्याचे किटबॅक आधीच घेतलेले आहे. निवडणुकीच्या आधी आणि नंतर साधारण 95 हजार कोटींची कामे कोणत्याही टेंडर शिवाय ठेकेदारांना वाटण्यात आली. त्यातली शेकडो, हजारो कोटींची किटबॅक आधीच घेण्यात आली हा एक अत्यंत गंभीर मुद्दा महाराष्ट्रात आणि दिल्लीत चर्चिला जात आहे. या पैशाचे वाटप शिंदेंनी त्यांच्या पद्धतीने केले असले तरी आज असंख्य ठेकेदार ज्यांच्याकडून कामाच्या आश्वासनानंतर हे पैसे घेतले गेले ती जर कामे त्यांना मिळाली नाहीत, तर ती बोलायला लागली असून काही ठेकेदारांनी न्यायालयात जाण्याची तयारी केल्याची माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.
न्यायालयावर दबाव आणू इच्छित आहेत का?
दरम्यान, शिंदे दिल्लीत वकिलांची भेट घ्यायला गेल्याचीही चर्चा आहे. यावर राऊत यांनी खास शैलीत प्रतिक्रिया दिली. अमित शहा त्यांचे वकील आहेत का? राजनाथ सिंह त्यांचे वकील आहेत का? नितीन गडकरी त्यांचे वकील आहेत? यांच्या माध्यमातून ते न्यायालयावर दबाव आणू इच्छित आहेत का? त्यांच्या मनात कोणती भीती सतावत आहे? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच अमित शहा, राजनाथ सिंह किंवा अन्य केंद्रीय नेत्यांच्या माध्यमातून हा खटला रेंगाळत ठेवला किंवा तुम्हाला हवे तसे निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतले. तुम्ही त्याच माध्यमाचा वापर करताय का हे सिद्ध होत आहे, असेही राऊत म्हणाले.