ट्रम्प तात्यांची आता ‘नासा’कडे वक्रदृष्टी, दोन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून वेगवेगळे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. जगातील वेगवेगळ्या देशांवर टेरिफचा बॉम्ब पह्डल्यानंतर आणि बिग ब्युटिफुल बिल यासारखे विधेयक आणल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाकडे वळवला आहे. ट्रम्प प्रशासनाकडून बजेटमधील कपात करण्यासाठी नासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे नासातील जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. अमेरिकेतील दहा केंद्रांवरील कर्मचारी कपात केली जाणार असून यामध्ये नासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नासामधील ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे, त्यामध्ये जीएस-13 पासून जीएस 15 ग्रेडचे अधिकारी आहेत. या गटातील अधिकारी हे विशेष कौशल्य आणि वरिष्ठ अधिकारी असतात. नासामध्ये अनेक दशके सेवा केली, त्या कर्मचाऱ्यांवरही नोकरी जाण्याची भीती आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे स्पेस एजन्सीमधील कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सरकार कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी सेवानिवृत्ती, ऐच्छिक राजीनामा आणि काही ठरावीक रक्कम देण्यावर विचार करत आहे. एका रिपोर्टनुसार, सरकारने 2 हजार 145 कर्मचाऱ्यांना पैसे घेऊन नोकरी सोडावी, अशी ऑफर दिली आहे. यातील 1818 कर्मचारी विज्ञान आणि मानव अंतराळ मिशन यासारख्या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टवर कार्यरत आहेत, तर काही कर्मचारी आयटीसह अन्य महत्त्वाच्या कामांवर कार्यरत आहेत. ट्रम्प सरकार या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना अर्ली रिटायरमेंट, बायआऊट, डिफर्ड रेजिग्नेशन यासारखे पर्यायसुद्धा देत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे नासाच्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावर पाठवणाऱ्या मिशनचे काय होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नासा सध्या विनाअ‍ॅडमिनिस्ट्रेटर काम करत आहे. ट्रम्प प्रशासनाने स्पेस टुरिस्ट जारेड आयजॅकमॅन यांची नामांकन प्रक्रिया अचानक थांबवली आहे. इलॉन मस्क यांनी स्वतः त्यांचा नावाचा प्रस्ताव ठेवला होता. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे मस्क आणि त्यांची कंपनी स्पेक्स एक्सविरुद्ध घेतलेला निर्णय आहे.