
अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रद्धा आहे. शनी शिंगणापुरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी देवस्थानातील शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. शनी शिंगणापूर देवस्थानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून बनावट अॅप तयार करून दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांकडून पूजाविधीच्या नावाखाली प्रत्येकी 1800 रुपये घेतले जातात. जून महिन्यात अशा पद्धतीने भाविकांकडून 36 कोटींपेक्षा जास्त रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली, असे आमदार लंघे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. बनावट क्यूआर कोड व पावत्या छापणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचा तपशीलच सादर केला.
एफआयआर दाखल, विश्वस्तांच्या मालमत्तेचीही चौकशी होणार
याप्रकरणी अंतिम सुनावणी चॅरिटी कमिशनर घेत आहेत. एफआयआर दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच मंदिर विश्वस्तांच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिराच्या नकली अॅपप्रकरणी सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानप्रमाणे शनी शिंगणापूर देवस्थानमध्येही समिती नेमण्याबद्दल निर्णय घेतला जाईल.
चौकशी अहवालात काय?
- देवस्थानाच्या रुग्णालयात 327 कर्मचारी काम करतात असे दाखवले गेले, परंतु प्रत्यक्ष तपासणीत तिथे फक्त 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारीच आढळले.
- कोणताही बगिचा नसताना बगिच्यासाठी 80 कर्मचारी दाखवले.
- 109 खोल्यांच्या भक्तनिवासात 200 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले गेले, परंतु पुणीही आढळून आले नाही.
- देणगी स्वीकारण्यास 8 तर तेल विक्रीसाठी 4 असे बारा कर्मचारी दाखवले गेले, पण काऊंटरवर फक्त 2 कर्मचारीच काम करताना आढळले.
- पार्किंगमध्ये 13 गाड्यांसाठी 163 कर्मचारी दाखवले प्रत्यक्षात 13 कर्मचारीच आढळले.
- शेती विभागात 35 एकर जमीन आहे तिथे 65 कर्मचारी, पाणीपुरवठा विभागात 180 दाखवले गेले, पण त्यांचे काहीच अस्तित्व नाही.
- गोशाळेत 82 कर्मचारी दाखवून त्यातील 24 कर्मचारी रात्री 1 वाजेपर्यंत काम करतात असे दाखवले गेले.